आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोखठोक राऊत:'राष्ट्रीय संदेशात स्वपक्षीयांना कोरोनाचे राजकारण थांबवा, एवढे पंतप्रधानांनी सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल'; संजय राऊतांचा मोदींना सल्ला

मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील भाजप पुढारी कोरोनाचे राजकारण करीत आहेत. त्यांनी दिल्लीत येऊन परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे.

कोरोनाची दुसरी लाट लाट अनेक राज्यांमध्ये आली आहे. तर दिल्लीत प्रदुषण आणि कोरोना दोन्हीही आहे. मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्रात अनेक मुद्द्यांवरुन भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. या सगळ्या घडामोडींवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र साधले आहे. तसेच राष्ट्रीय संदेशात स्वपक्षीयांना कोरोनाचे राजकारण थांबवा, एवढे पंतप्रधानांनी सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल असा सल्ला राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे.

'राजधानी दिल्लीत सध्या प्रदूषण आणि कोरोनाचीच लाट आहे. श्री. अमित शहा कोरोनातून बाहेर पडले. काँग्रेसचे नेते अहमद पटेल हे गुरगावच्या मेदांता इस्पितळात कोरोनाशी झुंजत आहेत. राजधानीत कोरोना वाढत आहे. महाराष्ट्रातील भाजप पुढारी कोरोनाचे राजकारण करीत आहेत. त्यांनी दिल्लीत येऊन परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे.' राज्यातील भाजप नेत्यांना राऊतांनी सल्ला दिला आहे.

अग्रलेखात नेमके काय?

  • 'महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. पाच वर्षे ज्यांनी राज्याची निरंकुश सत्ता भोगली त्यांनी किमान नीतिनियमांचे भान ठेवायला हवे. मुंबईत छठपूजेला परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपावाले आंदोलन करीत होते. बिहारची निवडणूक भाजपाने जिंकली हे खरे, पण मुंबईतील बिहारी जनतेस छठपूजेच्या वादात ओढण्याचे कारण नाही. छठपूजेसाठी समुद्रकिनारी एकाच वेळी हजारो लोक गोळा होतात व करोना संकटकाळात ते नियमबाह्य आहे. छठपूजा २० नोव्हेंबरला पार पडली, पण गर्दी जमवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांचा होताच. मुंबईत ज्यांनी छठपूजेसाठी आंदोलन केले त्यांनी इतर राज्यांत काय घडले ते पाहायला हवे'
  • 'भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. एखाद्या महत्त्वाच्या विषयावरील त्यांची भूमिका राष्ट्रीय हवी, पण तसे घडताना दिसत नाही. छठपूजा प्रामुख्याने बिहार पिंवा उत्तरेत केली जाते. मुंबईत हे लोण तसे अलीकडे आले. मुंबईत छठ पूजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी द्यावी अशी मागणी भाजपाचे नेते करतात. पण गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेशातील भाजपा सरकारने सार्वजनिक ठिकाणी छठ पूजेची परवानगी नाकारली हे महाराष्ट्रातील भाजपा नेते कसे विसरतात?
  • बिहारमधील बहुतेक सर्व जिल्ह्यात तेथील प्रशासनाने आदेश काढले की, छठपूजा घरच्या घरीच करा. सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणलीच, पण नदीच्या घाटांवर पोलिसांनी घेराबंदी करून ठेवली. रस्त्यांवर वाहनांनी यानिमित्त गर्दी करू नये म्हणून कडक निर्बंध लादले. हे सर्व करताना भाजपा हिंदुत्वविरोधी ठरत नाही, पण महाराष्ट्रात भाजपाची भूमिका वेगळी. मुंबईतील भाजपा नेते जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी परवानगी मागत होते, ते कोणत्या आधारावर?
  • मुंबईत पुन्हा करोना वाढवून सरकारला बदनाम करायचे हे राजकारण त्यामागे आहे. मात्र त्यात लोकांचे जीव जातात याचे भान ठेवले जात नाही. हे क्रौर्य आणि अमानुषता आहे. सरकारचे काही निर्णय मतभेदाचे विषय ठरू शकतात, पण प्रत्येक निर्णयाला विरोधच केला पाहिजे, प्रसंगी लोकांचे जीव गेले तरी चालतील हे धोरण घातक आहे!
  • महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला तो राजकीय होता. मंदिरे उघडण्याचा निर्णय घेत नाही, त्यामुळे ‘ठाकरे सरकार’ हिंदुत्वाच्या विरोधी असल्याची बोंब ठोकणे हे सरळ सरळ ढोंग आहे. हरयाणात भाजपचे सरकार आहे. तेथे शाळा उघडण्याचा निर्णय घेतला, पण ७२ तासांत पाचशेहून जास्त विद्यार्थी व शिक्षक कोरोनाबाधित झाले. बिहारात विजय मिळवला म्हणून करोनावरही विजय मिळवता येईल असे कोणाला वाटते काय?
  • कोरोनाच्या लढाईशी जे हिंदुत्ववादाचा संबंध जोडत आहेत ते जनतेचे शत्रू आहेत. दिल्लीत पुन्हा लॉक डाऊन करण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये. भाजपसारख्या पक्षांची तशी इच्छा असेल तर ते राज्याचे दुर्दैव! पुन्हा देशाचे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा या विषयावर जाहीरपणे काहीच बोलायला तयार नाहीत. बिहार जिंकले, आता प. बंगाल जिंकायचे असे भाजपने ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण खरे संकट कोरोना, घसरलेल्या अर्थव्यवस्थेचे. त्यावर कधी विजय मिळवणार? दिल्लीवर कोरोनाने हल्ला केला आहे. त्याच दिल्लीत राष्ट्रपती व पंतप्रधान मोदी राहतात. त्यांच्या डोळ्यासमोर लोकांचे बळी जात आहेत. एखाद्या राष्ट्रीय संदेशात स्वपक्षीयांना करोनाचे राजकारण थांबवा, एवढे पंतप्रधानांनी सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल.
  • बिहार जिंकले, आता प. बंगाल जिंकायचे असे भाजपने ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण खरे संकट कोरोना, घसरलेल्या अर्थव्यवस्थेचे. त्यावर कधी विजय मिळवणार? दिल्लीवर कोरोनाने हल्ला केला आहे. त्याच दिल्लीत राष्ट्रपती व पंतप्रधान मोदी राहतात. त्यांच्या डोळय़ांसमोर लोकांचे बळी जात आहेत. एखाद्या राष्ट्रीय संदेशात स्वपक्षीयांना कोरोनाचे राजकारण थांबवा, एवढे पंतप्रधानांनी सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल.