आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पूजा चव्हाण हिच्या मृत्यूवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ या सातत्याने या विषयी आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहेत. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आहेत. अत्यंत जागरूक व न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत,' असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री डोळे झाकून बसलेले नाहीत
संजय राऊत म्हणाले की, 'पूजा चव्हाण प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु आहे. मुख्यमंत्री हे अत्यंत संवेदनशील मनाचे आहेत. ते काय डोळे झाकून बसले नाहीत. मुख्यमंत्री हे कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत. राज्यातील प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे पूर्ण लक्ष असते. या प्रकरणाचा तपास होणार आणि पूजा चव्हाण आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळणार.' असे राऊतांनी स्पष्ट केले.
पूजाच्या कुटुंबियांना न्याय मिळेल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यापासून सातत्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विशेषतः भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळतेय. राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यात आघाडीवर आहेत. आज देखील भाजपकडून ठिकठिकाणी राठोड यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. या संपूर्ण घडामोडींविषयी संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पूजाच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.
चित्रा वाघ यांच्या आक्रमक भूमिकेवर बोलताना राऊत म्हणाले की...
'तुम्हाला काय वाटतेय? राज्याचे मुख्यमंत्री शांतपणे बसले आहेत का? राज्यात कोण काय बोलत आहे याकडे त्यांचे संपूर्ण लक्ष आहे. ते जागरूक मुख्यमंत्री आहेत. प्रत्येक घडामोडीकडे त्यांचे आहे. कोणत्याही गोष्टीचा तपास पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर बोला. मुख्यमंत्री सत्यवादी आणि न्यायप्रिय आहेत. ते कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत आणि कुणालाही पाठिशी घालणार नाहीत. असेही राऊत म्हणाले. यासोबतच चित्रा वाघ या विरोधीपक्षात आहेत. यामुळे त्या आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाची अतिरिक्त माहिती असेल तर त्यांनी ती राज्याचे गृहमंत्री आणि तपास यंत्रणाना द्यावी'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.