आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मनसुख हिरेन प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमध्ये गृहमंत्र्यांनी सचिन वझे यांची क्राइम ब्रांचमधून उचलबांगडी केली आहे. विधान परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. 'मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विधिमंडळात भाजपने थेट एपीआय सचिन वझे यांचे नाव घेतले होते. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले, की सचिन वझे यांना बाजूला करावे अशी मागणी विरोधकांकडून झाली. त्या प्रकारचा निर्णय आम्ही घेतला. त्यांना क्राइम ब्रांचमधून बाहेर केले आहे. त्यांना इतर ठिकाणी पाठवले जाईल.' आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की...
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'सचिन वझे हे उत्तम तपास अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी दोन प्रमुख प्रकरणांचा तपास केला आहे. अन्वय नाईक हे दडपलेले प्रकरण वझे यांनीच उघडकीस आणले होते. संबंधित व्हाईट कॉलर आरोपींना अटक करण्यात आली. हा देखील अन्वय नाईक कुटुंबीयांना न्यायच झालाय. त्याविषयी विरोधी पक्ष बोलत नाहीत. टीआरपी घोटाळ्यातही त्यांनी कारवाई केलेली आहे. सचिन वझेंना लक्ष्य केले जात आहे. या दोन प्रकरणात त्यांनी आरोपी तुरुंगात टाकले, हा मुद्दा त्यामागे असू शकतो' असा आरोप राऊतांनी लावला आहे.
विरोधी पक्षाने फक्त राजीनामा आणि बदल्यांमध्ये रमू नये
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'सचिन वझे हे एक उत्तम तपास अधिकारी आहे. स्कॉर्पिओ गाडीचे प्रकरण हे जास्त मोठे नाही. अंबानींच्या जीवाएवढीच सामान्य आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या जीवाची किंमत आहे. विरोध पक्षाने केवळ राजीनामा आणि बदल्यांमध्ये रमू नये' असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.
कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही -गृहमंत्री
पत्रकारांशी संवाद साधताना अनिल देशमुख म्हणाले, मनसुख हिरेन यांची बॉडी सापडली होती. त्याबाबतीत हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या प्रकरणाचा संपूर्ण तपास एटीएसला दिलेला आहे. महाराष्ट्राची संस्था एटीएस प्रोफेशनली चौकशी करत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरोप केले. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर द्यावे, त्याची रितसर चौकशी केली जाईल. जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कायद्याने कठोर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
त्याबरोबरच मोहन डेलकर यांनी जी मुंबईत आत्महत्या केली होती, त्याबाबत पत्नी, मुलगा आणि मुलगी यांनी काल मुख्यमंत्री आणि माझी भेट घेतली. मोहन डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकरच्या तक्रारीनुसार मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच याबाबत रितसर चौकशी सुरू आहे.
परंतु, केवळ क्राइम ब्रांचमधून हटवून चालणार नाही तर वझे यांना निलंबित करा अशी मागणी भाजपने लावून धरली. दरम्यान, यासंदर्भात सचिन वझे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.