आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोखठोक राऊत:'12 कोटींची मर्सिडीज घेतली, आता आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये', संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक या सदरातून राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. '12 कोटींची मर्सिडीज घेतली, आता आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये' असा टोला राऊतांनी लगावला आहे. तसेच 2021 साल सरले, पण 2022 या वर्षात आशेची किरणे दिसतील काय? असा खोचक सवालही राऊतांनी केला आहे.

संजय राऊतांनी अजून काय म्हटले?

  • 2021 अनेक जळमटे तशीच ठेवून सरले आहे. तेच निर्बंध, तेच सर्व प्रश्न 2022 च्या झोळीत टाकून 2021 सरले तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला असे चित्र दिसले नाही. 2020 मावळताना 2021 वर्षाला गोंधळ व अराजकाची भेट दिली. 2021 ने 2022 ला तोच नजराणा पुढे दिला. मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे.
  • 28 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या 12 कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये
  • मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वदेशीचा उपक्रम ज्या पंतप्रधानांनी सुरू केले, तेच परदेशी बनवटीच्या गाड्या वापरतात. पंडित नेहरू यांनी सदैव हिंदुस्थानी बनावटीची अॅम्बेसेडर गाडी वापरली. फाळणीनंतर त्यांच्या जीवितास सर्वांत जास्त धोका होता. महात्मा गांधी तर बेडरपणे भ्याड खुनी हल्ल्यास सामोरे गेले. जिवास प्रचंड धोका असतानाही इंदिरा गांधींनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख रक्षक बदलले नाहीत. तामीळनाडूच्या गर्दीत राजीव गांधी गेले व लिट्टेकडून मारले गेले. हे त्यांचे साहस होय. त्यांनी असे साहस करायला नकोच होते, पण केले. पंतप्रधान मोदींची 12 कोटींची बुलेटप्रूफ, बॉम्बप्रूफ कार म्हणून महत्त्वाची आहे.
  • मोदी उत्तर प्रदेशात सभा घेतात आणि दिल्लीत येऊन करोना, ओमायक्रॉनवर चिंता व्यक्त करतात. याला निर्बंध कसं म्हणायचं? निर्बंधांमुळए लोकांचा रोजगार, व्यवसाय बुडाला. त्यावर सरकारकडे 2021 सालातली उपाययोजना नव्हती आणि 2022 मध्येही नसेल. मावळते वर्ष आणि नव्या वर्षात फरक करण्यासारखी परिस्थिती नाही.
  • 2021 सालात म. गांधींविरोधात घोषणा दिल्या, नथुराम गोडसेंचा धर्मसंसदेच्या नावाखाली जयजयकार केला. गांधींना शिव्या देणारे कुणी साधू कालिचरण हे महाराष्ट्रातले आहेत. भाजपानं या वृत्तीचा साधा निषेध केला नाही. ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे, त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये आणि गांधी जयंतीस त्यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होण्याचे तरी ढोंग करू नये.
  • राजकारण्यांची विश्वासार्हता रसातळाला नेणारे वर्ष मावळले म्हणत नवे वर्ष कोणत्या आशांची किरणे दाखवणार? देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करणे आता अशक्यप्राय बनले आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून मोदी व सरकार 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहेत.
  • मोदी यांचे वृत्तवाहिन्यांवरील रोजचे 'दर्शन' पाहिले तर तेच स्वतः भ्रमंतीसाठी वेळ आणि पेट्रोल किती खर्च करीत आहेत ते लक्षात येते. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती, बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झाले ते पुरे झाले. 2022 सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे
बातम्या आणखी आहेत...