आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोखठोक राऊत:ही मनमानी, मस्तवालपणा आणि विकृत तानाशाही, देशातल्या तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय असा प्रश्न; राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पण सरकार घालवण्याची ही कुठली अलोकशाही पद्धत? राऊतांचा सवाल

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणापासून राज्य सरकार आणि विरोधीपक्षात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. भाजपकडून राज्य सरकारवर विविध आरोप केले जात आहेत. तर महाविकास आघाडीकडूनही या आरोपांना सडेतोड उत्तर दिले जात आहे. दरम्यान 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अटक झाली. अशा अनेक मुद्द्यांवरुन शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी विरोधकांवर सामनाच्या रोखठोक या सदरातून खोचक शब्दात निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यानंतर पासूनच भाजपकडून सरकार पाडण्याविषयी बोलले जात आहे. हे सरकार लवकरच पडेल असा पुनरोच्चार भाजपकडून केला जातो. यावरुनही संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'भाजपला राज्यातले सरकार कोणत्याही परिस्थितीत घालवायचेय. पण सरकार घालवण्याची ही कुठली अलोकशाही पद्धत? नागपुरातून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले ‘आठेक दिवसांत सरकार पाडू असं नागपुरातले भाजपावाले बोलतायत’. सरकार पाडू आणि सरकार पडेल या कैचीतच राज्यातला विरोधी पक्ष अडकून पडला आहे'

माजी मंत्री अनिल देशमुखांना ईडीने अटक केली आहे. यावरुनही राऊतांनी काही सवाल केले आहेत. ते म्हणाले की, 'हवेतल्या आरोपांवर केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करते आणि पुढच्या 24 तासांत हेच परमबीर सिंह महाशय चांदिवाल आयोगासमोर सांगतात की अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्यानं आरोपच नाकारले. देशमुख कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत आणि भाजपा त्याबद्दल जल्लोष करते. ही मनमानी, मस्तवालपणा आणि विकृत तानाशाही आहे' असे म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

तुरुंगांचेही खासगीकरण झाले
केंद्रातील तपास यंत्रणांविषयी बोलतानाही संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, 'आता रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळेच खासगी झाले. ईडी, सीबीआय, एनसीबी ज्या पद्धतीने काम करतंय, ते पाहाता त्यांचंच खासगीकरण झाल्याचं चित्र आहे. राज्यात याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू असं भाजपाचे नेते सांगतात तेव्हा देशातल्या तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय असा प्रश्न पडतो. मोदी है तो मुमकीन है! हे अशा वेळी खरे वाटते.' असा खोचक टोला देखील राऊतांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...