आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनीत राणांना शिवसेनेचे प्रत्युत्तर:कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तर त्यांचे नाक कापू, दुश्मनांच्या छाताडावर भगवा फडकवणार

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना कालही मजबूत होती आजही मजबूत आहे. तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांचे नाक कापू. शिवसेना उपनेत्या व प्रवक्ता संजना घाडी यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, असे वक्तव्य भाजप खासदार नवनीत राणा यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.

नवनीत राणा तोंड सांभाळून

संजना घाडी म्हणाल्या, नवनीत राणा कोण आहात आपण? 'सी' ग्रेड फिल्म मध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. हनुमान चालीसाशी आपला संबंध काय आहे. हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचे साधे उत्तर मुलाखती मध्ये आपल्याला देता आले नाही. आणि म्हणे मी हनुमान भक्त.

मनसे भाजपची डी टीम

भाजपच्या डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितले आणि तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात.

आणखी कशी वागणूक मिळायला हवी?

घाडी पुढे म्हमाल्या, ज्या बाईला लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेले मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती. तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली वगैरे वगैरे. म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत.

मुस्लिम कुटुंबीयांची मातोश्रीवर नमाज

बाळासाहेबांचे राहिले नाहीत. पण याच मातोश्रीवर बाळासाहेबांनी मुस्लिम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती. आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केला देखील. हे तुमच्यासारख्या 'मुंबईची मुलगी' म्हणवून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे.

कमळाबाईची सुपारी

पुढे राणा यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी सी-ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आणि आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे. कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई. त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही अशा फाजील वल्गना करून थेर महाराष्ट्राला दाखवू नका. असा टोला त्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...