आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांपूर्वीच श्रद्धा वालकरने आफताब पुनावालाविरोधात वसई पोलिसांकडे तक्रार केली होती. तेव्हाच तक्रारीची दखल घेतली असती तर आज माझी मुलगी जिवंत असती. मात्र, वसई पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोप आज पत्रकार परिषदेत श्रद्धा वालकरचे वडिल विकास वालकर यांनी केला.
श्रद्धाचे वडील विकास वालकर म्हणाले, वसई पोलिसांनी आम्हाला तेव्हा सहकार्य केले नाही. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संबंधित वसई पोलिसांची चौकशी करावी.
किरीट सोमय्याही उपस्थित
विशेष म्हणजे आज पत्रकार परिषदेत श्रद्धा वालकरच्या वडिलांसोबत भाजप नेते किरीट सोमय्याही उपस्थित होते. यावेळी श्रद्धा वालकरचे वडील म्हणाले, दोन वर्षांपूर्वी वसई पोलिसांकडे आफताब पुनावालाविरोधात श्रद्धा वालकरने तक्रार दिली होती. तेव्हाच तक्रारीची दखल घेतली असती तर आज श्रद्धा जिवंत असती किंवा तिच्या हत्येचे पुरावे मिळू शकले असते. मात्र, पोलिसांनी आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत सहकार्य केले नाही.
तपासाबद्दल समाधानी
विकास वालकर म्हणाले, माझ्या मुलीला न्याय मिळावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. श्रद्धा वालकर प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसेच, आतापर्यंत या प्रकरणात दिल्ली पोलिस व वसई पोलिस संयुक्तपणे करत असलेला तपास व्यस्थित सुरू आहे. त्याबद्दल आम्ही पूर्ण समाधानी असल्याचेही विकास वालकर म्हणाले.
आफताबच्या कुटुंबीयांची चौकशी करावी
विकास वालकर म्हणाले, माझी मुलगी श्रद्धा वालकरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे दु:ख मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे माझी प्रकृती खराब झाली. मात्र, आफताब पुनावालाने ज्या क्रूरतेने हत्या केली त्याबद्दल त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. आफताब पुनावालाच्या कुटुंबीयांची, भावाची सखोल चौकशी व्हावी. तसेच, या कटात जे कोणी सहभागी असतील, त्यांचाही चौकशी करावी.
सोमय्यांचे मुद्दे डावलले?
श्रद्धा वालकरच्या वडीलांनी आज लिखित निवेदन वाचून पत्रकार परिषदेत आपले मुद्दे मांडले. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या वेळोवेळी त्यांना सूचनाही करत होते. मात्र, विकास वालकर यांनी काही मुद्दे जाणीवपूर्वक डावलल्याचे दिसत होते. श्रद्धाच्या खुनाविषयीचा मुद्दा मांडून झाल्यावर विकास वालकर थांबले तेव्हा सोमय्यांनी त्यांना इतर मुद्द्यांची आठवण करून देत ते वाचण्यास सांगितले.
तेव्हा विकास वालकर पत्रकार परिषदेत म्हणाले, श्रद्धा वालकरसोबत जे झाले, ते इतर कुणासोबतही होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे 18 वर्षांनंतर तरुणांना दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्याचा विचार केला जावा. यानंतर निवेदनात डेटिंग अॅपचा मुद्दा होता. मात्र, तो विकाल वालकरांनी पूर्ण वाचलाच नाही. त्यानंतर धर्म जागृतीवर भर दिला जावा, असे सांगत विकास वालकर थांबले.
आफताबच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याला शुक्रवारी दिल्लीतील साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, न्यायालयाने आफताबच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. गेल्या महिन्यातही न्यायालयाने त्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सविस्तर वृत्त येथे वाचा...
हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.