आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच मंत्री कोरोनाग्रस्त:अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधी घटवण्याची चिन्हे; कोरोनामुळे मंत्र्यांचे दौरे रद्द; मात्र दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • छगन भुजबळ पॉझिटिव्ह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सोमवारी कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील ४ कॅबिनेट मंत्र्यांसह एका राज्यमंत्र्यास काेरोनाची लागण झाली आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अगदी तोंडावर असताना ५ मंत्री कोरोनाग्रस्त झाल्याने सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. कोरोनाची धास्ती आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी नियोजित दौरे, कार्यक्रम रद्द अथवा स्थगित केले आहेत. मात्र, ३० लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नसल्याने दहावी अाणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन अर्थात प्रत्यक्ष केंद्रावरच होणार आहेत.

छगन भुजबळ पॉझिटिव्ह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सोमवारी कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे या दोन कॅबिनेट मंत्र्यांना मागच्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. त्याशिवाय आरोग्यमंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू सध्या उपचार घेत आहेत. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले विलगीकरणात आहेत.

शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले १ मार्चपर्यंतचे सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही २३ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम व दौरे पुढे ढकलले आहेत.

अजित पवार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारचे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. पवार यांचे कामकाज सकाळपासून सुरू होते. मात्र आज त्यांनी नागरिकांच्या भेटी घेणेही टाळले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी हिंगोली दौरा रद्द केला.

उदय सामंत : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वरळी येथील कार्यक्रम रद्द केला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास हा कार्यक्रम घेतला जाईल. नागरिकांनी सर्व अडचणी अर्ज ड्रॉप बॉक्समध्ये द्यावेत, असे आवाहन सामंत यांनी केले आहे.

भाजपचे जेलभरो आंदोलन स्थगित : वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपने २४ फेब्रुवारीला जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला होता. हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिली.

विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवर उभे राहिले प्रश्नचिन्ह

  1. मार्च १ पासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या ५ मंत्री काेरोनाग्रस्त झाले आहेत. परिणामी त्यांना विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेता येणार नाही.
  2. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसाठी एक-एक आमदार महत्त्वाचा आहे. कोरोनाग्रस्त सदस्यांची संख्या वाढत गेल्यास सत्ताधाऱ्यांचे बळ कमी होऊ शकते.
  3. अर्थसकल्पीय अधिवेशन ५ आठवड्यांचे असते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंदा अधिवेशन दोन आठवड्यांचे होते. मात्र परिस्थिती गंभीर झाल्याने ते आठवड्यात गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.

३० लाख विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षांची सुविधा उपलब्ध होणे अशक्य : शिक्षणमंत्री
मुंबई | राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरीही विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने अाॅनलाइन परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर (आॅफलाइन) होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात मंत्रालयात सोमवारी शिक्षण विभागाची आढावा बैठक पार पडली. त्यानंतर त्या बोलत होत्या. दहावीची १६ आणि बारावीची १४ लाख अशी एकूण ३० लाख विद्यार्थी संख्या आहे. बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत आहे. पालकांची ऑनलाइन परीक्षांची विनंती आहे. मात्र तज्ज्ञ आणि राज्य मंडळाचा ऑनलाइन परीक्षा घेण्यास विरोध आहे. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधांचा अभाव आहे. एकाच वेळी इतक्या विद्यार्थांना आॅनलाइनची सुविधा उपलब्ध होणार नाही. ऑनलाइन परीक्षेसाठी तयारी करावी लागेल. या प्रक्रियेला वेळ लागला तर मागील वर्षाप्रमाणे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू होईल, असे तज्ज्ञ व मंडळाचे म्हणणे मांडल्याचे गायकवाड म्हणाल्या.

आतापर्यंत ४३ पैकी २६ मंत्री कोरोनाच्या विळख्यात
महाविकास आघाडीतील तब्बल ३३ कॅबिनेट मंत्र्यांपैकी १४ मंत्र्यांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सध्या ४ कॅबिनेट मंत्री कोरोनाग्रस्त आहेत, तर १० राज्यमंत्र्यांपैकी ७ जणांना कोरोना संसर्ग यापूर्वी झाला होता. सध्या एक राज्यमंत्री उपचार घेत आहेत. सरकारमधील ४३ पैकी २६ मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...