आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:मुख्य सचिवपदासाठी सीताराम कुंटे, प्रवीण परदेशी, संजयकुमार यांच्यामध्ये रस्सीखेच

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजोय मेहतांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या सल्लागारपदी वर्णी ?

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता येत्या ३० जून रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी या तिघांमध्ये राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी रस्सीखेच आहे.

अजोय मेहता यांच्यानंतर ज्येष्ठतेमध्ये तीन अधिकारी अग्रभागी आहेत. त्यापैकी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजयकुमार आणि मेहता दोघे १९८४ च्या बॅचचे. त्यामुळे कुमार यांची मेहता शिफारस करू शकतात, असे सांगितले जाते. संजयकुमार फेब्रुवारीमध्ये निवृत्त होत आहेत. परदेशी आणि कुंटे दोघे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून एक वर्षात उचलबांगडी केली होती. त्यामुळे परदेशी यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मुंबई पालिकेत कुंटे आयुक्त होते. त्यादरम्यान कुंटे यांच्याकडून सत्ताधारी शिवसेनेला पालिकेत विशेष अडचण उद्भवली नव्हती.

अजोय मेहता सप्टेंबर २०१९ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिने मुदतवाढ दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेहता यांना एक वर्ष मुदतवाढ द्यावी, अशी केंद्राकडे शिफारस केली होती. मात्र केंद्राने तीन महिने दिली. मेहता यांना पुन्हा मुदतवाढ मिळणे शक्य नाही. परंतु त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे सल्लागार म्हणून नेमले जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे. मेहता पालिकेत आयुक्त असताना शिवसेनेच्या वचननाम्यातील अनेक योजना मार्गी लागल्या होत्या. तसेच उद्धव यांच्यावर गेल्या सहा महिन्यांत बेकायदा कारभाराचा एकही आरोप झालेला नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा मेहतांना विरोध

मेहता यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे उद्धव तसा निर्णय घेणार नाहीत, असे शिवसेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री कार्यालयात सध्या प्रधान सचिव विकास खारगे आणि अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह कार्यरत आहेत. उद्धव यांना मुख्य सचिवपदाचा निर्णय घेताना राष्ट्रवादी व काँग्रेसचे मत विचारात घ्यावे लागेल, असे काँग्रेसच्या मंत्र्यांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...