आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना संकट:मुंबईत दहा लाख लोकांमागे सोळा हजार चाचण्या, फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सर्वाधिक चाचण्यांचा विक्रम, पालिकेने केला दोन लाख स्वॅब घेतल्याचा दावा

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दररोज ४ हजारांप्रमाणे २ लाख चाचण्यांचा टप्पा पार केला असून प्रति दहा लाख लोकसंख्येमागे १६ हजार चाचण्या करत मुंबईने देशात विक्रम रचल्याचा दावा शुक्रवारी पालिका प्रशासनाने केला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिकेने कोरोना चाचण्या घटवल्याचा आरोप केला होता. तो खोडून काढत मुंबई कोरोना चाचण्यांत देशात अव्वल असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

पूर्वी २ चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णास घरी सोडले जात असे. आता १ चाचणी निगेटिव्ह आली तरी घरी सोडण्याची मुभा आहे. तसेच क्ष-किरण तपासणीमध्ये सुधारणा, ऑक्सिजन पातळीमध्ये सुधारणा असे सकारात्मक बदल दिसून आले तर चाचणी न करता रुग्णास घरी पाठवाता येते. प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची पूर्वी सक्तीने चाचणी करण्यात येत असे. आता तशी आवश्यकता नाही. या मार्गदर्शक तत्त्वांमुळे चाचण्यांची संख्या कमी झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याच्या आरोपात तथ्य नाही. मुंबई वगळता महाराष्ट्रातील इतर भागात पूर्वी चाचणी करणाऱ्या वैद्यकीय प्रयोगशाळांची संख्या मर्यादित होती. ही संख्या अलीकडे वाढली आहे. स्वाभाविकच उर्वरित महाराष्ट्रातील चाचण्यांची संख्या वाढली आहे. मात्र मुंबईतील दररोजच्या सरासरी चाचण्यांची संख्या कायम आहे, असा दावा पालिकेने केला आहे.

मुंबईत आतापर्यंत सुमारे २ लाख १२ हजार चाचण्या झाल्या असून हे प्रमाण प्रति दशलक्ष १६ हजार ३०४ इतके आहे. हे प्रमाण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे. मुंबईमध्ये २२ वैद्यकीय प्रयोगशाळांमधून कोरोना चाचण्या केल्या जातात. या सर्व प्रयोगशाळांची मिळून दैनंदिन चाचणी क्षमता सुमारे १० हजार आहे. ही संपूर्ण क्षमता एकट्या मुंबईसाठी नाही, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या मैदानावर लढाई मुंबई पालिकेनेवर शिवसेनेची सत्ता आहे, त्यामुळे भाजप नेत्यांनी पालिका प्रशासनावर सध्या हल्ला चढवलेला आहे. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी पालिका प्रशासनाने कोरोना संदर्भातील आरोप फेटाळून लावले.

मृत्यूची आकडेवारी लपवली जात नाही

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही. उलट मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी १३ वरून आता १६ दिवस इतका झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित मृत्यूचा दर राष्ट्रीय सरासरीच्या जवळ आहे. १८ ते २४ मे या कालावधीत २८० इतके कोरोनाबाधित रुग्ण दगावले. हीच संख्या २५ ते ३१ मे या कालावधीत २७० असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

0