आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:मंत्री हसन मुश्रीफ-कुटुंबीयांकडून 127 कोटींचा घोटाळा - सोमय्या; मुश्रीफांच्या कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधींची कर्जे

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेच्या आणखी एका मंत्र्याचा घोटाळा लवकरच बाहेर काढणार

राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँड्रिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला. याबाबत सोमय्यांनी मुश्रीफ, त्यांच्या पत्नी व पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली. सोमय्या म्हणाले, मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आपल्याकडे असून मंगळवारी ते मुंबईतील ईडीच्या कार्यालयात सादर करून अधिकृत तक्रार देऊ. तसेच बुधवारी दिल्लीला जाऊन अर्थ मंत्रालय आणि तेथील ईडीकडे हे सर्व पुरावे सादर करणार आहे.

मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल (कागदोपत्री) कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून आल्याचा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

चंद्रकांत पाटलांच्या सांगण्यावरून सोमय्यांचे आरोप : मुश्रीफ
सोमय्यांविरुद्ध कोल्हापुरातील सत्र न्यायालयात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील व समरजित घाटगे यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांनी हे अारोप केले आहेत. अडीच वर्षांपूर्वी माझ्या घरावर आणि साखर कारखान्यावर छापा पडला. मात्र, अद्याप त्यांना काहीही सिद्ध करता आलेले नाही. कोणतेही आक्षेपार्ह कागद मिळाले नाहीत, या केसचा निकाल अजून प्रलंबित आहे.

दाव्यासाठी व्हाइट रक्कम लागते : पाटील
अब्रुनुकसानीचा दावा करताना २५% रक्कम कोर्टात भरावी लागते. ती त्यांच्या खिशात आहे का? तीही रक्कम व्हाइटच लागते, ब्लॅक चालत नाही, असा खोचक टोला चंद्रकांत पाटलांनी मुश्रीफ यांना लगावला. त्यांनी माझ्याविराेधात तक्रार करावी, मी घाबरत नाही, असेही आव्हान त्यांनी दिले.

शिवसेनेच्या आणखी एका मंत्र्याचा घोटाळा लवकरच बाहेर काढणार

  • सोमय्या म्हणाले, नावेद यांनी सीआरएम सिस्टिम या कंपनीकडून २ कोट तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्सकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतले. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत.
  • सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० शेअर्स आहेत. २००३ ते २०१४ या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले.
  • संताजी घोरपडे कारखान्याच्या नावावर मरुभूमी फायनान्सकडून १५.९० कोटी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सी ३५.६२ कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडिंग एलएलपी ४.४९ कोटी, नवरत्न असोसिएट्स ४. ८९ कोटी, रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस ११.८५ कोटी, माउंट कॅपिटलकडून २.८९ कोटी अशा रकमा जमा झाल्या आहेत.

संशयास्पद कंपन्यांसोबत आर्थिक व्यवहार
नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवताना उत्पन्नाबाबत दाखल शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसते. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक आहेत. या कारखान्याने कोट्यवधींची अफरातफर केल्याचे कागदपत्रांवरून दिसून आले आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...