आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलगीतुरा:शिंदे गटाचे काही आमदार संपर्कात : राऊत राऊतांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या : शिंदे

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले : मुख्यमंत्री

संजय राऊत यांनी म्हटले की, शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. सत्तापरिवर्तन होऊ शकते. ‘राऊत हे स्वप्न पाहत असतात, त्यांना स्वप्नात राहू द्या. राज्यात दोन्ही सदनांत दोन तृतीयांश बहुमतही आम्हाला आहे. आमचे सरकार भक्कम असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत संजय राऊतांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.’ दुसरीकडे, ‘एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खा. संजय राऊत यांनाही टोला लगावला.’

शिंदे म्हणाले की, ‘राऊतांना जे बोलायचे ते बोलू द्या, त्यांना स्वप्नात राहू द्या, पण आम्ही राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ. ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होते, त्यासाठी आमची दिल्लीवारी आहे. त्याचे काम सुरू असून कायदेविषयक बाबींबाबत बैठका घेतल्या. राज्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम सरकार करते, सर्वोच्च न्यायालयालाही मी आभार मानतो.’ मुख्यमंत्री म्हणाले, ‘मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करणार आहोत. आम्ही सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेल दरकपात, कर्ज प्रकरणे व प्रकल्पावर आम्ही काम सुरू केले आहे.’

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यास आश्चर्य नको : राऊत
‘उद्या महाराष्ट्रात पुन्हा सत्तापरिवर्तन झाले तर यात आश्चर्य वाटून घेऊ नका. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असेल,’ असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या मनात खूप गोंधळ आहे. शिंदे स्वत:ला शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणतात, तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाण्याची गरज नसते. अमित शहासुद्धा मातोश्रीवर येत होते, ते एक तेव्हाचे नाते होते. पण ५ वेळा मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जावे लागते, ते त्यांचे बस्तान मुंबईतून हलवतात की काय अशी स्थिती आहे. महिना झाला तरी दोघांचेच कॅबिनेट असून ते बेकायदेशीर निर्णय घेत आहेत. त्यात महाराष्ट्र आणि शिंदे यांच्या गटाला शिवसेनेतून बाहेर पडून काय मिळवले, याचे आत्मचिंतन करावे लागेल.

खोतकरांना दाद द्यावी लागेल : राऊत म्हणाले, ‘मी अर्जुन खोतकर यांचे अभिनंदन करतो. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले की, त्यांच्यावर आणि कुटुंबावर ईडीचा तणाव आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली नाही. त्यांना बदनाम केले नाही आणि फुटिरांसारखे आरोप केले नाहीत. ते खरे बोलले. त्यांच्या प्रामाणिकपणाला मी दाद देतो.’

‘कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात सांगण्याची गरज नाही’
गडचिरोली- कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत हे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत अजित पवार यांनी खा. संजय राऊतांना टोला लगावला. महिना होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार न होणे हे चांगले नाही. १६५ आमदारांचा पाठिंबा आहे असे म्हणता, मग मंत्रिमंडळ विस्तारास तुम्हाला कुणी अडवले, असा सवाल विधानसभेतील विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला केला. तसेच पूरस्थितीची पाहणी करण्याकरिता अजित पवारांनी एवढा उशीर का लावला, अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. त्यावर पवार म्हणाले, ‘आम्ही देखावा करत नाही, प्रत्यक्ष मदत करतो. बावनकुळेंनी माध्यमांपुढे बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असा उलट टोला लगावला.’

बातम्या आणखी आहेत...