आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Mumbai
 • SSC 10th Exams: SSC Exams Cancelled Students To Get Promoted With Internal Exam Ranks Education Minister। Varsha Gaikwad। Maharashtra SSC Board Exam News And Live Updates

मूल्यांकनाचे निकष स्पष्ट:परीक्षेविनाच दहावीचा जूनअखेर निकाल; 11 वी प्रवेशाकरिता ऑनलाइन सीईटी; श्रेणी सुधार योजनेंतर्गतही मिळणार दोन संधी

मुंबई / पुणे2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • राज्यातील 14 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतचे हे महत्त्वाचे मुद्दे

कोरोना प्रतिबंधांमुळे राज्यातील दहावीच्या २०२०-२१ वा शैक्षणिक वर्षातील परीक्षा रद्दच करण्याचा व अंतर्गत मूल्यमापनानुसार जूनअखेर १० वीचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य शालेय शिक्षण मंडळाने घेतला. त्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी जाहीर केले. जे विद्यार्थी या निकालाबाबत समाधानी नसतील, त्यांच्यासाठी काेविड स्थिती सुधारल्यावर श्रेणी सुधार योजनेअंतर्गत (क्लास इम्प्रूव्हमेंट) दोन संधी देण्यात येतील. अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमांवर अाधारित १०० गुणांची सीईटी हाेईल. हा निर्णय घेण्यासाठी विभागाने तज्ज्ञांच्या २४ बैठका घेतल्या. त्यात निकष निश्चित झाले. अाता शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार अाहे.

राज्यातील १४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबतचे हे महत्त्वाचे मुद्दे

 • 100 गुण असे निर्धारित केले जातील
 • 30 गुण वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनावर अाधारित
 • 20 गुण गृहपाठ, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेवर अाधारित
 • 50 गुण हे नववीच्या अंतिम विषयनिहाय गुणांच्या प्रमाणानुसार

सीईटीला प्रवेशासाठी प्राधान्य
अकरावी प्रवेशासाठी राज्यात आता एकच, १०० गुणांची, २ तासांची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) हाेईल. ती दहावीच्या अभ्यासावर आधारित, वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी तसेच ऐच्छिक असेल. मात्र, प्रवेशासाठी त्याच गुणांना सर्वाेच्च प्राधान्य मिळेल. अकरावी प्रवेशाची मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.

बहि:स्थ अाणि फेरपरीक्षार्थींचे गुण कसे ठरणार, याबाबत संभ्रमच
अंतर्गत मूल्यमापनाची हीच पद्धत १७ नंबर फाॅर्म भरणारे बहि:स्थ (एक्सर्टनल) आणि नापास झाल्यानंतर फेरपरीक्षा देणाऱ्या (रिपीटर) विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात येणार आहे. मात्र हे विद्यार्थी वर्गाबाहेरचे असतात. मग, त्यांचे मूल्यमापन कसे काय केले जाऊ शकते, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळातून विचारला जातो आहे. त्यावर काेणतीही घाेषण मंत्रालयाने केलेली नाही.

प्राप्त परिस्थितीत व्यवहार्य निर्णय - डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पुणे
हा निर्णय प्राप्त परिस्थितीत व्यवहार्य आहे. सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार शासनापुढे होता. हे लक्षात घेता ताे समर्थनीय अाहे. ही तडजोड, अपरिहार्यता आहे, हेही खरेच! दुसरा महत्त्वाचा मुद्दा सीईटी वैकल्पिक हा आहे. जे विद्यार्थी ती देतील, त्यांना अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य मिळेल. गेले काही दिवस परीक्षा रद्द केल्याने शुल्क परत करावे, अशी मागणी हाेत होती.

सीईटीचा निर्णय घेऊन शिक्षण विभागाने त्याला परस्पर उत्तर दिले. अकरावीच्या प्रवेशात ‘कटऑफ’ महत्त्वाचा ठरताे. अाता सीईटीचा स्कोअर प्राधान्याने लक्षात घेतला जाणार असल्याने अधिकाधिक विद्यार्थी सीईटी देतील. ही तारीख लवकर जाहीर झाल्यास दहावीची परीक्षा रद्द केल्यावर बंद केलेली पाठ्यपुस्तके पुन्हा उघडण्यासाठी पुरेसा वेळ विद्यार्थ्यांना मिळू शकेल.

 • सीईटीचा पॅटर्न लवकर ठरवावा
 • प्रश्नाचे स्वरूप, विषयांचे भारांश (वेटेज) ठरवावे
 • संकेतस्थळावर त्याचा नमुना जाहीर करावा

प्रत्येक शाळेत ७ सदस्यांची समिती
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शालेय स्तरावर सात सदस्यांची समिती असेल. विभागीय स्तरावरील अधिकारी निकालाची पडताळणी करतील. एखाद्या शाळेत मूल्यांकनात गैरप्रकार झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

काेर्टातील सुनावणीबाबत वेळकाढूपणा
एक जून रोजी मुंबई हायकाेर्टात या परीक्षेसंदर्भात सुनावणी आहे. शुक्रवारी विभागाच्या वतीने परीक्षा काेराेना काळात घेणे कसे अशक्य आहे, याचेे प्रतिज्ञापत्र सादर हाेणार होते. मात्र त्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी एका अर्जाद्वारे केल्याची माहिती या जनहित याचिकाकर्त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. परीक्षेविना अंतर्गत मूल्यांकनाचे धाेरण ठरले अाहे, तर प्रतिज्ञापत्र सादर न करता मुदतवाढीची मागणी का? हा वेळकाढूपणा फक्त या प्रकरणात मंत्रालय बॅकफूटवर असल्याने केला जात असल्याचे सूत्रांचे मत अाहे.

बातम्या आणखी आहेत...