आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डावपेच:‘एसटी’चे विलीनीकरण नाहीच; सरकार ठाम, कर्मचारीही अडले, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देऊन संप मोडून काढणार?

प्रतिनिधी | मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करायचे नाही, यावर सरकार ठाम असून संप मोडून काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्याचे समजते. तर संपकरी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसले असून ते आता संघटनांचे नेते आणि भाजप नेत्यांचेही ऐकेनासे झाल्याने संप चिघळला आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

एसटीचे विलीनीकरण ही कायदेशीर बाब नसून ती केवळ वित्तीय बाब आहे. त्यामुळे न्यायालय विलीनीकरणासंदर्भात सरकारला आदेश देऊ शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विलीनीकरणाच्या पूर्ण विरोधात असल्याचे समजते.

दरम्यान, एसटीच्या २,२९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा दिल्या आहेत. कर्मचारी कामावर येत नसतील तर २०१७ आणि २०१९ च्या भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी गुरुवारी संपकऱ्यांना दिला. इकडे संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून परिवहनमंत्री परब यांनी गुरुवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच संपावर तोडगा काढण्यावर चर्चा केली. फडणवीसांच्या सूचनांवर आम्ही विचार करू, असे परब म्हणाले. “एसटी कामगारांना वेतनवाढ द्यायला सरकार तयार आहे. प्रश्न बेसिक वेतनाचा आहे. चर्चेने तो सोडवला जाईल,’ असे परब यांनी सांगितले.

बुलडाण्यात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपादरम्यान विष प्राशन केलेल्या खामगाव आगारातील सहायक मेकॅनिक विशाल प्रकाश अंबलकार यांचा उपचारादरम्यान अकोला येथे १७ नोव्हेंबरला मृत्यू झाला. १६ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अंबलकार (रा. माटरगाव) या अविवाहित कर्मचाऱ्याने त्याच्या राहत्या घरी विष प्राशन केले होते. त्यांना त्वरित खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्यामुळे पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले. दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास विशाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

४५ वर्षांपेक्षा कमी, त्यावरील कर्मचाऱ्यांची विभागणी

९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांत ४५ वर्षांखालील व त्यावरील अशी वेतनावरून विभागणी आहे. ४५ वरील कर्मचाऱ्यांना ५० हजार, तर आतील कर्मचाऱ्यांना १६ हजार वेतन आहे. ज्येष्ठ कर्मचारी संप ताणून धरण्याच्या मन:स्थितीत नाहीत. यामुळे सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे.

वित्तीय शिस्तीवर पवार ठाम

  • शरद पवार यांचे एसटी संपाकडे बारीक लक्ष आहे. राज्य सरकारने वित्तीय शिस्त पाळावी, असा पवारांचा आग्रह आहे.
  • संपावर तोडगा काढत नसल्याने शरद पवार यांनी एसटी कर्मचारी संघटनांचे नेते हनुमंत ताटे यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते.
  • संपकरी कर्मचारी हे आता संघटनांचे नेते आणि संपाचे नेतृत्व करत असलेल्या भाजप नेत्यांचेही ऐकेनासे झाले असून त्यामुळे संप चिघळला असल्याचे समजते.

गोपीचंद पडळकरांसोबत परब यांची ४ तास चर्चा
आझाद मैदानावर बसलेले संपकऱ्यांचे नेते गोपीचंद पडळकर यांच्याशी परब यांनी ४ तास चर्चा केली. विलीनीकरण सोडून सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची सरकारची तयारी आहे. मात्र विलीनीकरणावरून ही चर्चा फिसकटल्याचे समजते.

७,५४१ कर्मचारी ड्यूटीवर
गुरुवारी एसटीचे एकूण ७ हजार ५४१ कर्मचारी कामावर उपस्थित होते. २२ मार्गांवर ९३ बसेस धावल्या. त्यातून २ हजार ४५७ प्रवाशांनी प्रवास केल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...