आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
याविषयी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, 'आपणा सर्वांना माहिती आहे की ज्या प्रकारे राज्यात करोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आज मी आपल्याशी संवाद साधत असताना मी इयत्ता पहिली ते आठवी याचे वार्षिक मुल्यमापन संदर्भात मी बोलणार आहे. मला सांगायला पाहिजे की मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले होते. '
'पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षात आपल्याला सुरू करता आल्या नाहीत. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, मात्र काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण होऊ शकला नाही. परंतु आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न करत होतो, की मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहचावे आणि मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.'
'आता कोरोनाची परिस्थिती पाहता आणि वार्षिक मुल्यमापनाबाबत निर्णय घेताना, आम्ही शालेय शिक्षण माध्यमाद्वारे असा निर्णय खेतला आहे की, पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत, आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरेतर या मुलांचे वर्षभराचे मुल्यमापन बघायला हवे, मात्र यंदाची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे यंदा हे होऊ शकणार नाही. म्हणून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून असा निर्णय घेतला आहे की, राज्यातील जे पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाऱ्याच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यात येणार आहे.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.