आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:राज्याचा अर्थसंकल्प पेन ड्राइव्हमध्ये, तरी बॅगांची खरेदी, राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 मार्चपासून

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने २०२१-२२ या वर्षापासून अर्थसंकल्पीय प्रकाशने पेन ड्राइव्हमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुमारे एक लाख पानांची ९२ अर्थसंकल्पीय पुस्तिकांची छपाई होणार नाही. परिणामी कागद आणि छपाईचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे. तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही वित्त विभागाने ८४२ लगेज बॅॅगांसाठी निविदा काढली आहे.

विधिमंडळ सदस्यांना अर्थसंकल्पीय प्रकाशनाच्या प्रती लगेज बॅगमध्ये देण्याची गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे. यंदा प्रकाशने पेन ड्राइव्हमधून दिली जाणार आहेत. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 1 मार्चपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात सन २०२१-२२ या वर्षांचा अर्थसंकल्प मांडला जाईल.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थसंकल्पीय प्रकाशने पेन ड्राइव्हद्वारे तसेच संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. कोरोना साथीच्या संकटामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. निधीची चणचण असल्याने सरकार खर्च कपातीवर सरकार भर देत असल्याचे सतत सांगत आहे.

विधानसभेचे २८८, विधान परिषदेचे ७८ आमदार आणि अधिवेशनाचे वार्तांकन करण्यासाठी येणाऱ्या पत्रकारांना चाकाची लगेज बॅग देण्यात येते. सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशने बॅगेत नेता यावीत असा त्यामागचा हेतू आहे. यंदा अर्थसंकल्पीय प्रकाशने पेन ड्राइव्हद्वारे दिली जाणार आहेत. मग लगेज बॅगांची गरजच नाही. तरीसुद्धा वित्त विभागाने ८४२ लगेज बॅगा खरेदीसाठी ५८ लाख ८२ हजार रुपयांच्या खर्चास मंजुरी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.