आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मुलाखत:स्वबळाचा नारा सोनिया, राहुल गांधी यांचाच! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई3 महिन्यांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीरपणे आणि ठासून सांगितले आहे. राज्यात सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्याने स्वबळाची केलेली ही घोषणा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नाराज करणारी ठरली. यानंतर पटोले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीत भेटून आले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि पटोले यांची नेमकी भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ही भूमिका त्यांच्याच शब्दांत...

विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्वबळावर लढायचे की नाही हा निर्णय घ्यायला अजून बराच वेळ आहे आणि तो निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील; पण सध्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय २०२४ ला डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेला आहे हे नक्की. सोनिया आणि राहुल गांधी यांनाही राज्य पुन्हा पहिल्यासारखे काँग्रेसमय झालेले पाहायचे आहे. - नाना पटाेले, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष

काँग्रेस व राष्ट्रवादीने पूर्वीही स्थानिक संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढल्या आहेत. त्यामुळे तीच घोषणा करण्यात आता नावीन्य काय?
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर गेल्या २२ वर्षांत अनेक ठिकाणी आम्ही दोघे स्वतंत्रपणे लढलो हे खरे असले तरी आता पहिल्यांदाच संपूर्ण राज्यातील अशा सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यांना निवडणुकीतून ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेचा १०० टक्के परिणाम तुम्हाला २०२४च्या निवडणुकीत पाहायला मिळेल.

म्हणजे त्या निवडणुकाही स्वतंत्रच लढल्या जातील, असा या विधानाचा अर्थ घ्यायचा का?
- ते मी सांगू शकत नाही. तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील; पण या निर्णयाचे परिणाम २०२४ च्या निवडणुकीत १०० टक्के काँग्रेसच्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळतील.

राहुल गांधी यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली? विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची नाही, असे त्यांनी सांगून टाकले आहे, असे तुम्ही म्हणाल का?
- त्या विषयावर आमची चर्चा झाली नाही हेच खरे आहे. कारण त्याला अजून वेळ आहे; पण हेही खरे की प्रत्येक पक्षाला तयारी करावीच लागते. हायकमांडचेही हेच म्हणणे आहेे. सोनियाजी आणि राहुल गांधी यांना राज्य पुन्हा पूर्वीप्रमाणे काँग्रेसमय झालेले पाहायचे आहे. राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. त्या वर्गाचा सन्मानही राखला पाहिजे. समजा कोणाबरोबर आघाडी झालीच तर त्या पक्षाला आणि त्यांच्या उमेदवारांनाही काँग्रेसमुळे आपण निवडून आलो आहोत याची जाणीव असावी एवढी ताकद तर पक्षाची असलीच पाहिजे.

मुंबई पालिका निवडणुकीत काय चित्र असेल?
- मुंबईची ही निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी अनेकदा एकत्रच लढले. मुळात हे शहर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव असलेले शहर आहे. मुंबईत खरी लढत होते ती काँग्रेस आणि शिवसेना याच पक्षांत. आताही तशीच लढत होईल आणि काँग्रेसचा महापालिकेतील प्रभाव वाढलेला असेल हे नक्की. त्यासाठी ही निवडणूकही १०० टक्के आम्ही स्वबळावरच लढणार आहोत.

तुमच्या आणि राहुल गांधींच्या भेटीनंतर मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. काय ठरले त्या चर्चेत?
- आमच्या भेटीत अशी कोणतीही चर्चा झाली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या एकेका मंत्र्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरायचा निर्णय त्यांनी घेतला तरच काँग्रेस विचार करेल आणि त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींचा आहे.

एच. के. पाटील आणि काँग्रेसचे दोन मंत्री शरद पवार यांना भेटायला गेले त्यावेळी तर त्यांनी मंत्रिमंडळाबाबत चर्चा केल्याचे सांगितले...?
- सरकार आणि पक्ष संघटन या दोन्ही स्वतंत्र बाबी आहेत. त्यामुळे त्यांनी चर्चा केली असेल तर मला माहिती नाही. माझी राहुलजींशी त्या विषयावर चर्चा झाली नाही हे नक्की.

पक्षाध्यक्ष म्हणून त्यांनी त्याबाबत तुम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते, असे नाही का वाटत?
- विषय सरकारचा असेल तर त्यासाठी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आणि समन्वय समितीचे सदस्य त्यात होते. खरे म्हणजे पवार साहेबांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना भेटायला एच.के. पाटील यांना जायचे होते. तसे ते गेले होते.

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतले होते असे सांगितले. मित्रपक्ष म्हणून तुम्हाला कल्पना दिली होती का?
- त्या दोघांची भेट होणे यात खरे तर नाविन्य काहीच नाही. ते काही पहिल्यांदा भेटलेले नाहीत. मोदींनी अनेकवेळा पवार आपले गुरू आहेत, असे सांगितले आहेच. राहिला प्रश्न मला कल्पना असण्याचा. तर ती मोठी माणसे आहेत. त्यामुळे ते सोनियाजींशी बोलले असतील. मी काय, लहान माणूस आहे.

तुम्हाला ऊर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व्हायचे आहे, असे सांगितले जाते. नक्की हीच खाती हवी आहेत का?
- मी सामान्यांचे भले करता यावे यासाठी राजकारणात आलो आहे. व्यवसाय म्हणून त्याकडे पाहत नाही आणि तडजोडीही कधी करत नाही. शेतकरी आणि मागास वर्गासाठी मी एका मिनिटात खासदारकी सोडली. विधानसभेचे अध्यक्षपदही क्षणात सोडले. मी निगोसीएशन केले असते तर मंत्री त्याचवेळी होऊ शकलो असतो. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राहुलजींनी मला विचारले की राज्यसभा पाहिजे की विधान परिषद? मी त्यांना सांगितले की, मला पक्षाची संपत्ती बनून राहायचे आहे, लायबेलिटी म्हणून नाही. मी खुर्चीसाठी कधीच राजकारण करीत नाही. गांधी कुटुंबाने मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानले आहे हेच माझ्यासाठी खूप मोठे आहे. मंत्रिपद त्यापुढे खूप लहान गोष्ट आहे.

पण तुम्ही मंत्रिमंडळ असाल तर मंत्रिमंडळात काँग्रेसला आवाज मिळेल असे काँग्रेसचेच लोक म्हणतात?
- काँग्रेसचा आवाज मंत्रिमंडळात नाही असे नाही. अनुभवी मंत्री तिथे काम करताहेत आणि त्यांच्या कामाचे मूल्यमापन पक्षश्रेष्ठी करताहेत. काँग्रेसचा विचारच गांधीवादी आहे. प्रामाणिकपणे काम करत राहायचे. त्याची प्रसिद्धी करायची नाही ही आमची कार्यपद्धती आहे. शेवटी ते ठरवतील ते काम प्रामाणिकपणे करायचे एवढेच खरे आहे.

कृषी विधेयकाला पब्लिक डोमेनमध्ये टाकून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी काँग्रेसची तात्पुरती समजूत काढली आहे, असे म्हणतात. त्या पक्षांना ते आहे तसेच मंजूर करून घायचे आहे. तुम्ही याकडे कसे पाहता?
- या विधेयकासाठी दोन महिन्यानंतर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आम्ही करणार आहोत. त्यात शेतकऱ्यांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून बदल केले जातील. त्याच अधिवेशनात अध्यक्षांची निवड केली जाईल.

कोण असेल अध्यक्षपदाचा उमेदवार?
- त्या संदर्भात आम्ही राहुलजींकडे विचारणा केली होती. त्यावर ते म्हणाले की, आधी निवडीची प्रक्रिया सुरू होऊ द्या, मग उमेदवार देऊ. त्यामुळे त्यावेळी तेच ठरवतील उमेदवार.

तुम्ही नितीन राऊत यांचे नाव दिले आहे असे समजते.
- नाही. मला ते ठरवण्याचा अधिकार नाही आणि मी कोणाचे नावही दिलेले नाही.

राऊत यांच्या खात्याविषयी तुम्ही केलेल्या आरोपांमुळे त्यांना दिल्लीत जाऊन सोनियांकडे तुमची तक्रार करावी लागली.
- हे खरे नाही. खनिकर्म विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्यांना ठेका दिला गेला होता त्यातून आमचेच मंत्री अडचणीत आणण्याची संधी केंद्रातील सरकारला मिळाली असती. तसे होऊ नये म्हणून राऊत यांनीच मला पक्षाच्या माध्यमातून तक्रार करायला सांगितली होती म्हणून मी केली. ते दिल्लीत गेले म्हणजे सोनियांनाच भेटतील हे मीडियाने रचलेले कथानक आहे. आता मीडियाने काय छापावे हे ठरवण्यासाठी आम्ही काही मोदी नाहीत.

शिवसेना किंवा राष्ट्रवादी केंव्हाही भाजपचा हात धरून पळून जातील, अशी चर्चा आहे. अशा वेळी तोंडावर पडू नये म्हणून तुम्ही सावध आहात का?
- ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हापासूनच बाळगायची ती सावधगिरी सोनियाजींनी बाळगलेली आहे. त्यामुळे आता नव्याने सावध व्हायची गरज नाही. पवार साहेब किंवा ठाकरे साहेब मोदींना भेटले असतील तर कशासाठी भेटले, ते पुढे काय करणार आहेत याची जासुसी करणारा आमचा पक्ष नाही. जासुसी कोण करतं हे आता तर सर्वांच्या पुढे आले आहे.

राज्य सरकार जासुसी करते आहे, असे तुम्हीच तर म्हणाला होतात आत्ता?
- नाही. तो गैरसमज पसरवण्यात आला आहे. काही बाबतीत सरकारला लक्ष ठेवावेच लागते हे समजावून सांगण्यासाठी मी कार्यकर्त्यांना ते सांगत होते. याचा अर्थ सरकार जासुसी करते असा होत नाही.

ओबीसी आरक्षणाबाबत पक्षाची काय भूमिका आहे?
- या विषयावर आम्ही लवकरच आंदोलन सुरू करत आहोत. नागपूर जिल्हा परिषदेतील सत्ता जात होती म्हणून त्यावेळी फडणवीस सरकारने अध्यादेश काढून फसवणूक केली आहे. म्हणून विधानसभेत आपण ठराव केला. त्यानंतर भाजपने विधिमंडळात आणि बाहेरही जो तमाशा केला त्यामुळे त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात उघडे पडले आहेत. आता तर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करायलाच नकार दिला आहे. त्यांना हे आरक्षण नकोच आहे. त्याविरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहोत. ओबीसी समाजाला काँग्रेस न्याय मिळवून देईल.

बातम्या आणखी आहेत...