आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्मरण:स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दाखवलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतिपथावर नेणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘आधुनिक भगीरथ’ गौरव ग्रंथ, ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे प्रकाशन

जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता, अशा राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी गृहमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या‍ विचारांचे मार्गदर्शन घेऊन, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतिपथावर नेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले. स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या १०० व्या जयंती दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या ‘आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे, तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे आणि दै. सत्यप्रभाच्या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.

स्वातंत्र्याची जपणूक करताना आणि त्याचे स्वराज्यात रूपांतर करताना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणारे स्व. शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व होते. सुजलाम सुफलाम राज्य निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले. माजी मुख्यमंत्री स्व. चव्हाण कडक शिस्तीचे होते, त्यामुळे त्यांना हेडमास्तर म्हटले जाई. त्यांनी सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरण करणे असो किंवा भोंगा वाजवून वेळेत काम सुरू करण्याची कल्पना असो, त्यांचे कार्य आणि विचार नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. आजच्या युगात असे व्यक्तिमत्त्व सापडणे कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले.

जगात आई-वडिलांसारखा गुरू नाही. त्यांच्या मुशीत आणि कडक शिस्तीत घडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आज मंत्रिमंडळात माझे सहकारी म्हणून काम करतात याचा आनंद आहे. स्व. चव्हाण यांना घरातही शिस्त लागायची, दंगा आवडायचा नाही, असं हे शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व होतं. मी शाळेत असताना शंकररावांना पाहिलं होते. त्यांच्या बातम्यांमधूनही त्यांची शिस्त डोकावायची, माणूस कडक वाटायचा अशा आठवणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितल्या.

विचार नवीन पिढीपर्यंत जाणे गरजेचे

स्व. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नवीन पिढीला व्हावा यासाठी ‘आधुनिक भगीरथ’ हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हा ग्रंथ गावपातळीपर्यंत पोहोचून त्यांचे विचार राज्याच्या तळागाळात जायला हवे, असे विचार विधानसभा अध्यक्ष नाना पटाेले यांनी यावेळी व्यक्त केले. विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्व. शंकरराव चव्हाण यांनी राज्याच्या प्रशासनाला वेगळी दिशा दिली. जायकवाडी, उजनी सारखी धरणे ही त्यांच्या उत्तम जलनियोजनाची उदाहरणे आहेत. जल नियोजनातून पाण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे त्यांच्या गौरव ग्रंथाला दिलेले ‘आधुनिक भगीरथ’ हे नाव सार्थ आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, यंदा राज्याचा हीरक महोत्सव व माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण होणे ही आजची गरज आहे. स्व. चव्हाण यांचे विचार, दूरदृष्टिकोन नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

लोकराज्यचा विशेषांक संग्राह्य : चव्हाण

मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, माजी गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सर्व पक्षांतील नेत्यांशी चांगले संबंध होते. माजी मुख्यमंत्री स्व. चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्य शासनाने अनेक विकासकामे सुरू केली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे, भोकर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र उभारणे, जल संवर्धनात काम करणाऱ्यांसाठी जलपुरस्कार देणे आदी उपक्रम राबविले आहेत. ‘आधुनिक भगीरथ’ गौरव ग्रंथ आणि लोकराज्यचा विशेषांक हे वाचनीय व संग्राह्य झाले आहेत.

ग्रंथ तळागाळापर्यंत पाेहाेचावा

स्व. शंकरराव चव्हाण यांचे वर्णन एका वाक्यात करणे शक्य नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारा आधुनिक भगीरथ हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. हा ग्रंथ तळागाळात गेला पाहिजे. तो वाचला गेला पाहिजे. ग्रंथातील विचारांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचा मार्ग दिसत असतो. विशेषांकाच्या अनुक्रमणिकेवरूनही त्यांचे सर्वस्पर्शी नेतृत्व दिसून येते.