आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा उद्योग:कोकणात मोठा स्टील प्रकल्प येणार, समुद्रकिनाऱ्यालगत 5 हजार हेक्टर जमिनीची मागणी, राज्य सरकार अनुकूल

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोकणात बारसू रिफायनरीवरून वातावरण तापले असताना आता आणखी एक मोठा प्रकल्प येण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत.

कोकणात मोठा स्टील प्रकल्प येण्याच्या हलचालींना वेग आला असून त्यासाठी समुद्रकिनारी 5 हजार हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे. या घटनांना औद्योगिक विकास महामंडळाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

नक्की प्रकल्प काय?

आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून, त्यांनी नवा प्रकल्प कोकणात उभारण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी समुद्रकिनारी ५ हजार हेक्टर जागेची मागणी केली आहे.

आठवड्याभरापूर्वी औद्योगिक विकास महामंडळाची आण या कंपनीची मुंबईत बैठकही झाली. या कंपनीला अपेक्षीत असणाऱ्या ठिकाणांची माहिती देण्यात आली असून प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली आहे.

प्रकल्पासाठी गुंतवणूक किती?

या कंपनीकडून या स्टील प्रकल्पासाठी 80 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. याबाबत सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. महाराष्ट्रात स्टील उद्योगांमध्ये आणखी गुंतवणूक करण्याची इच्छा कंपनीने व्यक्त केली होती. यासाठी ५ हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. तसेच बीकेसी बांद्रा येथे कंपनीच्या मुख्यालयासाठी जागा देण्याचीही विनंती करण्यात आली.

रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता

सध्या कोकणात विजयदुर्ग आणि जयगड बंदर, रस्ते आणि रेल्वेने जोडण्याचा केंद्रीय दळणवळण विभागाचा प्रस्ताव आहे. याबाबतची घोषणा नितीन गडकरी यांनी पनवेलच्या कार्यक्रमात केली होती. त्यामुळे या भागात रोजगार निर्मितीला वाव आहे. त्यामुळे या कंपनीला कोकणात किनारपट्टी भागात जागा देण्याचा सरकारचा मानस आहे. याबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी या प्रकल्पासाठी सरकारने अनुकूलता दाखवली आहे. मात्र, कोकणात बारसू प्रकल्पाला कडाडून विरोध होत असतानाच नव्या स्टील प्रकल्पाने डोके वर काढल्याने या प्रकल्पाकडे कोकणवासीयांचा कसा सूर असेल याकडे लक्ष असणार आहे.