आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल यांची मागणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकूण संख्येच्या 30 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास कायद्याने प्रतिबंध

राज्य सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वाढीव बदल्यांना दिलेली परवानगी मागे घेऊन कायद्याचे उल्लंघन टाळावे. राज्यातील कोरोनाची गंभीर स्थिती, तिसऱ्या लाटेचा धोका आणि पुराचे संकट लक्षात घेऊन सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळाव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी पत्राद्वारे केली. सरकारने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीची मर्यादा वाढवून २५ टक्के केली आहे. त्यासोबत विशेष कारणास्तव १० टक्के बदल्यांना परवानगी दिली आहे. अशा रितीने एकूण संख्येच्या ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास परवानगी दिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे २००५ मध्ये राज्यात बदलीचा कायदा झाला. एकूण संख्येच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास कायद्याने प्रतिबंध झाला आहे. तथापि, एकूण ३५ टक्के बदल्यांना परवानगी दिल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होते, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. आघाडी सरकारच्या काळात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बाजार मांडल्याच्या तक्रारी उघडपणे होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी बदल्यांचा कोटा वाढविल्यामुळे अधिक बाजार करण्यास संधी मिळत आहे.

आघाडीतील मित्रपक्षांच्या दबावाखाली किंवा अन्य कोणाच्या दबावाने मुख्यमंत्र्यांनी बदल्यांच्या बाजाराला मोकळीक दिली तरी मूळ आदेश त्यांच्या मंजुरीने निघाला असल्याने बेकायदेशीर बाबींची जबाबदारी त्यांचीच राहील, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती करायची की नाही याबाबत दिल्लीला जाऊन आल्यानंतर निर्णय घेऊ, सांगितले होते. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी त्या सीडीची मी वाट पाहत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप आणि मनसेची युती होते की नाही, हे कळणार आहे. याबाबत अजून निर्णय झाला नाही.

पूरग्रस्तांना तातडीची मदत आवश्यक
राज्यातील कोरोना स्थिती अजूनही गंभीर असल्याची राज्य सरकारची धारणा आहे. सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्यास कोरोनाविरोधी कामावर प्रतिकूल परिणाम होईल. तसेच राज्यातील पूरग्रस्त भागात लोकांना मदतीची तातडीने गरज असताना सरकारी यंत्रणेत मोठ्या प्रमाणात बदल केले तर संकटग्रस्तांसाठी आणखी नुकसानकारक ठरेल. कोरोनाच्या स्थितीत बदल्या करू नयेत, असे सरकारचे मूळ धोरण गेल्या वर्षी होते आणि त्यानुसार सध्याच्या परिस्थितीत बदल्या टाळाव्यात, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...