आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण पेटले:राज्यसभेच्या निकालानंतर महाविकास सरकार पाडण्याची रणनीती; चाणक्य नीतीने पाडली सेनेत फूट

मुंबंई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहाटेच्या शपथविधीनंतर तोंडघशी पडलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत कुशाग्र रणनीती, मुत्सद्दी राजकारण आणि संघटनात्मक कौशल्याच्या बळावर शिवसेनेत उभी फूट पाडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेला जोरदार झटका दिल्याने आपल्या नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

संख्याबळ नसतानाही राज्यसभेत सहावा उमेदवार देण्यापासून फडणवीसांनी खेळीला सुरुवात केली. अपक्षांना आपल्या बाजूने वळवत एकेक मताचे काटेकोर नियोजन करून राज्यसभेतील तीनपैकी तीन, विधान परिषदेतील पाचपैकी पाच जागा जिंकून भाजपचे पारडे जड करीत शिवसेनेला भगदाड पाडण्याची खेळी यशस्वी केली. ११ जूनच्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने १२३ आमदार वळवण्यात यशस्वी फडणवीसांनी दहाच दिवसांत झालेल्या राज्यसभा निवडणुकीत ही संख्या १३४ वर नेली. अजित पवारांच्या रूपाने राष्ट्रवादीचा गटनेता गळाला लावण्याची रणनीती फसल्यावरही नामोहरम न होता शिवसेनेच्या गटनेत्यास गळाला लावत मोठे भगदाड पाडण्यात आणि सत्ताधाऱ्यांना हादरवण्यात विरोधी पक्षनेता म्हणून ते यशस्वी ठरले. मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असल्यापासून प्रशासकीय पकड, संघटनात्मक कौशल्य आणि मुत्सद्दी खेळी या गुणांच्या जोरावर फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून चांगले काम केले.

उद्धव : सेनेच्या आमदारांबाबतही बेसावध

महाविकास आघाडी सरकारची मोट जुळून आल्याने मुख्यमंत्रिपदावर विराजमान उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून अपयशी ठरले. पक्षातील आमदारांसोबत तुटलेला संवाद, स्वत:च्याच मंत्र्यांसोबत निर्माण झालेला दुरावा आणि एकनाथ शिंदेंसारख्या पक्षातील वजनदार नेतृत्वास उचित संधी न देता, त्यांची नाराजी दूर करण्यातही त्यांचे नेतृत्व अपयशी ठरले.

महाविकास आघाडी सरकारचे सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे यांचे संघटनात्मक कौशल्य कामी आले, मात्र सत्तेवर बसल्यावर मात्र आमदारांशी संवाद न ठेवणे, पक्षातील नेत्यांना विश्वासात घेण्यात अपयशी ठरणे हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील कमकुवतपणा दिसून आला. अपक्षांचा गमावलेला विश्वास, राज्यसभेतील संजय पवारांचा पराभव आणि अखेरीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षात पडलेल्या उभ्या फुटीची कुणकुण न लागणे आणि अस्वस्थता शमवण्यासाठी प्रयत्न न करणे हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा कच्चा दुवा यातून पुढे आला.

पक्षातील दोन-चार जणांवर अति विसंबून राहिल्याने अनेकांची नाराजी धगधगत राहिली व राज्यसभा, विधान परिषद या निर्णायक निवडणुकांमध्ये आकड्यांच्या खेळीत मागे पडले. नेते सोडून जाणे शिवसेनेला नवीन नसले तरी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रिपद ही दुहेरी नेतृत्वाची जबाबदारी पार पाडता आली नसल्याचे दिसते.

बातम्या आणखी आहेत...