आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:जातीचे वर्तुळ मोठे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची धडपड, सवर्ण व मधल्या जात गटांना चुचकारण्याचा प्रयत्न

अशोक अडसूळ | मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 400 हून अधिक पोलिसांचा पंढरपुरात बंदोबस्त, एसटी बंद

लाॅकडाऊन उठवावे, मंदिरे खुली करावीत, अशी वंचितची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘चलो पंढरपूर’चा नारा देऊन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी अांदोलन पुकारले आहे. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या अपयशानंतर बहुजन वंचित आघाडी हा भटके विमुक्त, इतर मागासवर्ग, शेतकरी जात गट यांच्यात आपली जागा शोधत आहे. त्याचाच भाग म्हणून अॅड. आंबेडकर यांनी हे आंदोलन हाती घेतले असून बिगर दलित जात समूहांना चुचकारण्याचा त्यांचा राजकीय अजेंडा आहे.

राज्यात अनुसूचित जातीचे मतदार १० टक्क्यांच्या आसपास आहेत. त्यातील चर्मकार शिवसेनेकडे, मातंग भाजपकडे आणि नवबौद्ध हे काँग्रेस व इतर रिपाइं गटांत विभागले आहेत. राज्यात नवबौद्ध मतदार ४.५ टक्के आहे. विदर्भात टक्का मोठा आहे. एकजातीय मतदारांच्या भरवशावर आपला उमेदवार जिंकत नाही. इतर पक्षांशी युती केल्याशिवाय किंवा इतर जातगटांना बरोबर घेतल्याशिवाय उमेदवार निवडून येत नसल्याचे रिपाइं गटांना कळून चुकले आहे. म्हणून २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अॅड. आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ हा आपला पक्ष वंचित बहुजन आघाडीत विलीन केला. लोकसभेच्या सर्व जागा लढवल्या. त्यात ४१ लाख (७.६४%) मते मिळवली. वंचितचा मत टक्का धक्कादायक वाढला कारण, या निवडणुकीच्या तोंडावर कोरेगाव भीमा हिंसाचाराचे प्रकरण घडले होते. त्यानतंर पाच महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. वंचितने २३४ जागा लढवल्या. तर २४ लाख मते (४.६ टक्के) मिळवली. एकही जागा निवडून आली नाही. कारण या निवडणुकीत दलित मतदार मुख्य प्रवाहातील पक्षांकडे गेला होता.

एकीकडे दलित मतदारांना चुचकारण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. तर दुसरीकडे दलितांचे मुख्य नेत्यांपैकी एक असलेले अॅड. आंबेडकर आपले जात वर्तुळ मोठे करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अॅड. आंबेडकर दलितांचे राजकीय आरक्षण संपवा, अशी सातत्याने मागणी करत आहेत. इतकेच नाही तर मराठा, मुस्लिम, धनगरांच्या आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहे.

तरीही विजयापासून ‘वंचित’

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचितने भटके विमुक्त १८ टक्के, अनुसूचित जातीचे १७ टक्के, इतर मागासवर्ग ११ टक्के, मुस्लिम ९ टक्के, मराठा ७ तर आदिवासी ९ टक्के उमेदवार दिले. अगदी ख्रिस्ती, शीख, जैन, ईस्ट इंडियन उमेदवार दिले होते. तरी वंचितकडे धनगर, वंजारी, माळी, मराठा आकर्षित झाले नाहीत.

राजकीय घडामोडींचे केंद्र बदलले

आजपर्यंत अॅड. आंबेडकर यांच्या राजकीय घडामोंडीचे केंद्र अकोला जिल्हा असे. आता सोलापूर जिल्हा आहे. २०१९ ची लोकसभा ते सोलापुरातून लढले, वंचितची घोषणा पंढरपूरला केली. आता याच जिल्ह्यातील विठ्ठल मंदिराचे आंदोलन हाती घेतले आहे.

४०० हून अधिक पोलिसांचा पंढरपुरात बंदोबस्त, एसटी बंद

श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करावे या मागणीसाठी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीने सोमवारी (दि. ३१) पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरहून ये-जा करणाऱ्या एसटीच्या सर्व फेऱ्या रविवारी मध्यरात्रीपासून ३६ तास बंद करण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी मंदिर परिसराकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेडिंग करून बंद केले आहेत. तसेच ५० अधिकारी आणि सुमारे ४०० वर पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे सध्या शहराला पोलिसी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या आंदोलनाला बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनेदेखील पाठिंबा देण्यात आला आहे.