आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका महिलेनं गर्भारपणाच्या सातव्या महिन्यांत मुदतपूर्व बाळाला जन्म दिला आहे. या महिलेला हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब कमी झाला होता. तसेच हृदयाची गती सुमारे १५० मिनिटे होती. अशा स्थितीत मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात ही प्रसूती यशस्वी करण्यात आली आहे. या महिलेने एका मुलाला जन्म दिला असून आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. १४ दिवस या महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानुसार तिच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने तिला घरी सोडण्यात आले.
वोक्हार्ट रुग्णालयातील कन्सल्टंट फिजिशियन डॉ. प्रितम मून यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बिपिन जिभकाटे (सल्लागार आणि प्रमुख क्रिटिकल केअर मेडिसिन), डॉ. मंगला पाटील (सल्लागार प्रसूतिशास्त्रज्ञ), डॉ. समीर शेख (सल्लागार नवजात तंत्रज्ञ) या डॉक्टरांच्या टीमने ही प्रसूती यशस्वीरित्या पार पाडली आहे.
मीरारोड येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय हेतल गांधी या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. अचानक ताप आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. याठिकाणी डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार या महिलेच्या छातीचा सीटीस्कॅन करण्यात आला. वैद्यकीय चाचणीत महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. गर्भवती महिलेची प्रकृतीत बिघडत असल्याने कुटुंबियांनी त्यांना मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले.
मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील सल्लागार आणि प्रमुख क्रिटिकल केअर मेडिसिन डॉ. बिपीन जिभकाटे म्हणाले की, ‘‘वैद्यकीय चाचणीद्वारे गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान केले. या चाचणीत महिलेच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी खूप कमी होती, म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. याशिवाय या महिलेची रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा खूप कमी होती. तसेच महिला गर्भवती असल्याने त्यांना वारंवार उलट्यांचा त्रास होत होता. अशा स्थितीत त्यांना ऑक्सिजन पुरवणे गरजेचे होते. त्यामुळे या महिलेला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. कोरोनातून बरे होण्यासाठी या महिलेला कोविड-१९ ची औषध सुरू करण्यात आली होती. प्रकृती सुधारत असल्याचे दिसून आल्यावर १४ दिवसांनी व्हेंटिलेटर काढण्यात आले.''
कोरोना पॉझिटिव्ह असताना या महिलेने ३१ व्या आठवड्यात मुदतपूर्व बाळाला जन्म दिला आहे. मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील सल्लागार प्रसूतीशास्त्रज्ञ डॉ. मंगला पाटील म्हणाल्या की, ‘‘या महिलेच्या शरीरात ऑक्सिजनची मात्रा खूपच कमी होती. अशा स्थितीत प्रसूती करणं हे जीवघेणं ठरू शकतं. परंतु, अशा अवघड परिस्थितीत या महिलेची प्रसूती यशस्वी करण्यात आली आहे.’’
या रुग्णालयातील कन्सल्टंट नियोनाटोलॉजिस्ट डॉ. समीर शेख म्हणाले की, ‘‘जन्मानंतर बाळाचे वजन १५६० ग्रॅम इतके होते. वेळेआधी जन्माला आल्याने या बाळाला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. काही दिवसांनी प्रकृतीत सुधारणा दिसून आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले.’’
वोक्हार्ट रूग्णालयातील कन्स्टंन्ट फिजिशियन डॉ. प्रितम मून म्हणाले की, ‘‘कोरोनाबाधित असल्याने या महिलेवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. २५ दिवस त्यांना रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. महिलेच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्याने ती बाळाला स्तनपान देऊ शकते.’’
रूग्ण हेतल गांधी म्हणाल्या की, ‘‘कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्याने मी खूप घाबरले होते. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मी आणि माझं बाळ दोघेही सुखरूप आहोत. आता माझ्या बाळाची तब्येतही सुधारली आहे.’’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.