आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलजीबीटीक्यूआयए:समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता द्या, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडून विधेयक संसदेत सादर

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत विशेष विवाहाचे सुधारित विधेयक लोकसभेत सादर केले आहे. एलजीबीटीक्यूआयए यांच्यासह इतरांना विवाह संबंधित समान हक्क मिळावेत हा यामागचा उद्देश असल्याचे सुळे यांनी सांगितले आहे. 2018 साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेतील सेक्शन 377 काढून टाकले. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय एलजीबीटी समुदायासाठी ऐतिहासिक होता. त्यापूर्वी समलैंगिक संबंध असणे हा गुन्हा होता. मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितले की यापुढे समलैंगिक संबंध असणे हे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा ठरणार नाही. हा न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक होता.

377 काढल्याने समलिंगी व्यक्तींना कायदेशीर मान्यता मिळाली आहे. विकासासाठी अशा प्रकारचा निर्णय होणे गरजेचे होते. समाजात अद्यापही एलजीबीटी समुदायाला भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विशेष विवाह कायदा 1954 मध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली. यातून समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यतेसह एलजीबीटी जोडप्यांना मान्यता मिळेल, असे मत यावेळी सुळे यांनी व्यक्त केले आहे.

हस्तक्षेपामुळे कायद्याचे संतुलन बिघडेल - केंद्र सरकार
याआधी दिल्ली उच्च न्यायालयात या विवाहांना कायदेशीर मान्यता द्यावी, अशी याचिका करण्यात आली होती. यावर केंद्र सरकारने उत्तर देताना आपले कायदे स्त्री आणि पुरूषाच्या विवाहालाच मान्यता देतात असे स्पष्ट केले होते. या प्रकरणी हस्तक्षेपामुळे देशात कायद्याचे संतुलन बिघडेल किंवा अनागोंदी निर्माण होईल, असे मत केंद्र सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केले आहे.

आपला समाज समलैंगिक विवाहाला मान्यता देत नाही - केंद्र सरकार
समलैंगिक विवाहाला आपल्या समाजाकडून मान्यता नाही, नाही हा विवाह आपल्या मुल्यात बसतो. आपली व्यवस्था आणि कायदा समलैंगिक विवाहाला मान्यता देत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने अशा विवाहांना परवानगी देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र असे असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे. आता यावर संसदेत काय निर्णय होणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...