आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Supriya Sule On BJP Government: Constrained Consumption By Drastically Increasing Gas Cylinder Rates; Insensitivity Of Central Government

सुप्रिया सुळेंचा आरोप:गॅस सिलिंडर दरात भरमसाठ वाढ करून वापरावर मर्यादा आणली, ही केंद्र सरकारची असंवेदनशीलताच

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजपसरकारने थेट नागरिकांच्या जेवणावर, सण - उत्सव साजरे करण्यावर आणि एकंदरीत मुलभूत हक्कांवरच बंधन घातले आहे. त्यामुळे या निर्णयाचा एक गृहिणी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जाहीर निषेध केला.

ऐन नवरात्रौत्सवात देशातील महिलांच्या हिताचा निर्णय घेण्याऐवजी मोदीसरकारने गृहिणींच्या चिंतेत आणखी भर घालण्याचे काम केले आहे. एकीकडे एलपीजी गॅस सिलिंडर दरात भरमसाठ वाढ करायची आणि दुसरीकडे गॅस सिलिंडर वापरावर मर्यादा आणायची, यातून केंद्रसरकार किती असंवेदनशील आहे हेच दिसून येते, असा हल्लाबोलही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत केला आहे.

महिन्याचा कोटा दोनवर

केंद्राच्या नव्या नियमानुसार उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी नसलेल्या ग्राहकाला वर्षभरात केवळ १५ आणि अनुदानित असलेल्या ग्राहकाला १२, तर दोघांसाठीही महिन्याचा कोटा २ सिलिंडरचा करून मोदी सरकारने प्रत्येक गृहिणीच्या चिंतेत आणखी भर घातली आहे. ही बातमी वाचण्यात आली व अक्षरशः धक्काच बसला, असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

ई-गव्हर्नन्सचा गाजावाजा

दुसरीकडे एखाद्या ग्राहकाला जर गॅस सिलिंडरची आवश्यकता असल्यास त्यासाठी गॅस सिलिंडर कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. तसेच त्याचा पुरावा देऊन, त्यासाठी कागदपत्रे सादर करून त्यानंतरच त्या ग्राहकाला अतिरिक्त रिफिल मिळू शकेल. एकीकडे ‘ई-गव्हर्नन्सचा’ गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे अतिरिक्त गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी पुन्हा नागरिकांना कागदपत्रे घेऊन खटाटोप करायला लावायचा यातून केंद्रसरकारची कार्यपध्दती किती कुचकामी आहे हेच पाहायला मिळते असा थेट आरोपही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला आहे.

महिला वर्गाची चेष्टा

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर केंद्रसरकारने हा निर्णय घेऊन समस्त महिला वर्गाची अक्षरशः चेष्टाच केली आहे. संसाराचा रहाटगाडा चालवायचा कसा असा प्रश्न आता माझ्यासह देशातील अनेक गृहिणींना पडलाय असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या आहेत.

सणासुदीत बंधने

देशात मोठ्या प्रमाणावर सण उत्सव साजरे केले जातात. या सणासुदीत विविध पक्वान्न, खाद्यपदार्थ तयार करण्याची परंपरा आहे. त्यामुळे घराघरात या काळात गॅस सिलेंडरची सर्वाधिक आवश्यकता असते परंतु केंद्राच्या केवळ १५ सिलेंडरच घेण्याच्या नियमामुळे देशवासियांना मर्यादेमध्ये गॅस सिलिंडर वापरावा लागणार असून आपले सण उत्सव हे बंधन घालूनच साजरे करावे लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

गृहिणींना टाकले चिंतेत

केवळ सण उत्सवच नव्हे, तर अनेक महिला या घरगुती डबे पुरवण्याचे काम करतात किंवा अनेक विद्यार्थी पेईंग गेस्ट किंवा समूहाने राहतात. अशांसाठी गॅस सिलिंडरची जास्त आवश्यकता असते. परंतु या निर्णयाने महिला, विद्यार्थी व पेईंग गेस्टसारख्या सर्वांनाच चिंतेत टाकण्याचे काम मोदी सरकारने केले आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...