आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीची टीका:सुप्रिया सुळे म्हणाल्या- लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभे!

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतून गुजराती तसेच राजस्थानी लोकांना काढल्यास पैसाच शिल्लक राहणार नाहीत, हे लोकं नसले तर मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही, अशा स्वरूपाचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. यानंतर मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना, काँग्रेस, शिंदे गट तसेच राष्ट्रवादीनेही यावर टीका केली आहे.

राज्यपालांचे हे विधान हुतात्म्यांचा अवमान करणारे- खासदार सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते. याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभे राहिले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे. हे शहर कष्टकरी, कामगार आणि मजुरांनी कष्टाने उभारले. मुंबईवर पहिला हक्क या सर्वांचा आहे. जो या मातीत जन्माला आला आणि मुंबईवर प्रेम करतो त्या सर्वांसाठी ही 'आमची मुंबई ' आहे.

अमोल मिटकरींचीही टीका

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरून राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. मिटकरी म्हणाले की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी-भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, अशी मागणीही मिटकरींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...