आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनिल देशमुख यांच्या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने 109 वेळा छापे मारून विक्रम केला. आता तो मोडायची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा झालेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. त्यामुळे कागलमध्ये मुश्रीफ समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी सकाळी जोरदार घोषणाबाजी केली.
नेमके प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने छापे मारले. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळाप्रकरणी ही कारवाई सुरू आहे. कोलकात्यातील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होती. तसेच, या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर ही कारवाई होते आहे.
दडपशाहीकडे प्रवास
सुप्रिया सुळे यांनी या कारवाईचा जोरदार शब्दात निषेध नोंदवला. त्या म्हणाल्या की, सध्या संविधानाच्या चौकटीबाहेरून जाऊन कारवाया सुरू आहेत. दडपशाहीकडे आपला प्रवास सुरू आहे. केंद्र सरकारकडून विरोधकांविरोधात यंत्रणांचा वापर होत आहे. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांच्यावर अन्याय झाला. आता तशाच पद्धतीने कारवाई सुरू आहे.
जाणूनबुजून टार्गेट
सुप्रिया सुळे या कारवाईबद्दल संताप व्यक्त करताना पुढे म्हणाल्या की, देशभरात ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत. त्यातल्या 95 टक्के कारवाया विरोधकांवर होत आहेत. कारवाई होणार असल्याचे आधीच भाजपच्या नेत्यांना कळते. अर्थात सीबीआय, ईडीमध्ये कुठेतरी लीकेज असल्याचे वाटते. हा सारा प्रकार आपण गृहमंत्री अमित शहांच्या निदर्शनासा आणून देणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.