आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे फडणीस सरकारमधील मंत्र्यांनी कर्नाटक दौरा रद्द केल्याने राजकारण टिपेला पोहचले आहे. शरद पवारांनी ऐंशीच्या दशकात कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या, पण माघार घेतली नाही, असे खडेबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावलेत.
शिंदे-फडवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आज कर्नाटकातल्या सीमावर्ती भागातल्या दौऱ्यावर होते. मात्र, महापरिनिर्वाणदिनी सीमावाद चिघळू नये. काही गालबोट लागू नये म्हणून हा दौरा रद्द केल्याची भूमिका सरकारच्या वतीने मांडण्यात आली आहे. यावरच सुप्रिया सुळे यांनी खडेबोल सुनावलेत.
आंदोलनाची आठवण झाली...
सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरू झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली. साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या, पण माघार घेतली नाही. खुद्द एस. एम. जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमेटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता. सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती.
पवारांनी शक्कल लढवली...
सुप्रिया पुढे म्हणतात की, कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्णय समितीने घेतला. खुद्द एस. एम. जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचे नियोजन केले. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असे ठरविले. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली. पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांकडे होते.बेळगावात दाखल होण्यासाठी साहेबांनी एक शक्कल लढविली.
पवार झाले ड्रायव्हर...
सुप्रिया पुढे म्हणतात की, पवार साहेब कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवले. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली, परंतु त्यांना काहीच कळले नाही. साहेब बेळगावात पोहोचले, पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता. बेळगावात जमावबंदी होती. साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला.आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले.
पाठीवर वळ उमटले...
संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पवार साहेब, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आले. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस. एम. जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एस.एम. हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारेच ३६० अंशात बदललेय, अशी टीकाही सुळे यांनी केलीय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.