आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरेच्या बाजारात अक्कल विकली:सुप्रिया सुळेंची भिडे गुरुजींवर शेलकी टीका; टिकली लाव म्हणल्यामुळे महिला आयोगाचीही नोटीस

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली, अशा शेलक्या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीका केलीय. तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाने भिडे यांना नोटीस बजावलीय.

‘तुझ्या कपाळाला टिकली नाही. त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही’, असे महिला पत्रकाराला म्हणल्यामुळे संभाजी भिडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. या वक्तव्यामुळे त्यांना चोहोबाजूने टीकेचा सामना करावा लागतोय.

नेमके प्रकरण काय?

संभाजी भिडे यांनी काल मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना घेरले. एका महिला पत्रकारानेही त्यांना या भेटीबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा तुझ्या कपाळाला टिकली नाही. त्यामुळे प्रतिक्रिया देणार नाही, असे भिडे म्हणाले. शिवाय आपली भारतमाता विधवा नाही. प्रत्येक स्त्री ही भारतमातेसमान असते. तू कुंकू लाव. मग मी तुझ्याशी बोलेन, असा सल्लाही त्यांनी दिला. भिडे यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतोय.

कवितेतून शेलकी टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांची एक कविता फेसबुकवर शेअर करून भिडे यांच्यावर जोरदार टोलेबाजी केलीय. ती कविता अशी...

तू आणि मी ….?

मी लावतो टिळा

तू लाव टिकली

परंपरेच्या बाजारात

अक्कल आम्ही विकली

मी लावतो भस्म

तू लाव कुंकू

गुलामीचा शंख

दोघे मिळून फुंकू

तू घाल मंगळसूत्र

मी घालतो माळ

मनूने मारलेली रेषा

मनोभावे पाळ

तू घाल बांगड्या

माझ्या हातात गंडा

मुकाट्याने ऐक नाहीतर

आमच्या हातात दंडा

मी घालतो मोजडी

​​​​​​​तू जोडवे घाल

सप्तपदी च्या मर्यादेत

जन्मभर चाल

तू घाल अंबाडा

​​​​​​​मी शेंडी राखतो

विज्ञानाच्या प्रगतीला

परंपरेने झाकतो

​​​​​​​मी घालतो टोपी

तू घाल बुरखा

बायकांच्या गुलामीवर दोन्हीकडे

एकमत आहे बर का…!!!

मी धोतरात, तू शालूत

​​​​​​​होऊ परंपरेचे दास

साने गुरुजी ते भिडे गुरुजी

महाराष्ट्राचा प्रवास …..!!!!!

- हेरंब कुलकर्णी

आयोगाकडून दखल

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या वक्तव्याची तात्काळ दखल घेत भिडे यांना नोटीस पाठवली आहे. त्यात चाकणकर म्हणतात की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ सीविकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे याकरिता प्राधिकृत करण्यात आले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तृत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहचविणारे असल्याचे म्हटले आहे.

भिडेंना महिला आयोगाने बजावलेली नोटीस.
भिडेंना महिला आयोगाने बजावलेली नोटीस.

खुलासा मागवला

चाकणकर पुढे म्हणतात की, आपल्या वक्तव्याबाबत समाजातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. तरी कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार तात्काळ सादर करावा.

बातम्या आणखी आहेत...