आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड झीरो रिपोर्ट:कोरोनातून वाचले पण प्रवासाने मेले; मुंबईकरांच्या नशिबी रोज मरणयातना

मुंबई / अशोक अडसूळ7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 हजार इमारतींमध्ये घुसलाय कोरोना; गणेशोत्सवातील दुर्लक्ष भोवले

आटाेक्यात आलेला काेरोना गणेशोत्सव काळात पुन्हा फैलावला असून नोकरी टिकवण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. मात्र, लोकलमध्ये प्रवेश नसल्याने २५ लाख मुंबईकरांच्या नशिबी रोज पाच तास प्रवासातील मरणयातना नशिबी आल्या आहेत.

मुंबईत काम करणारे नोकरदार विरार, खोपोली, कर्जतपर्यंत राहतात. लोकल केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी असून इतरांना रिक्षा, एसटी, बेस्टचा आधार आहे. परिणामी, पूर्वी महिना पाचशेचा प्रवास खर्च आता चार हजारांवर गेला. गरजेपोटी अनेक जण बेकायदा लोकलप्रवास करतात, असे दैनंदिन नऊ हजार प्रवासी पकडले जात आहेत. बेस्ट केवळ १६ लाख प्रवाशांना पुरते आहे. राज्याचा परिवहन विभाग अन् पालिका शिवसेनेकडे आहे, तरी एमएमआर क्षेत्रातील प्रवासाच्या सोयीची बाेंब आहे. जम्बोमध्ये गेलेला परत येत नसल्याची भीती आहे. त्यामुळे जम्बो रुग्णालये ओस आहेत. पालिकेच्या डॅशबोर्डवर कोविडच्या खाटा शिल्लक दिसतात, तरी खाटेसाठीची मुंबईकरांची वणवण अजून संपलेली नाही.मुंबई कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करते आहे. मुंबईकरांना गणेशोत्सवात केलेले दुर्लक्ष भोवले आहे. शहरात सध्या दैनंदिन १८०० ते २२०० रुग्ण आढळत असून ४० रुग्णांचा मृत्यू होतो. पालिका एका रुग्णामागे ३० संशयितांचा शोध घेतेय, तरी कोरोना आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही.

अतिदक्षता खाटांची संख्या केवळ १९२३, लोक विनामास्कच घराबाहेर
मुंबापुरी देशाची आर्थिक राजधानी. मात्र, या शहरातील सर्व खासगी रुग्णालयांत अवघे ४१७ तर सार्वजनिक रुग्णालयांत ७२० व्हेंटिलेटर आहेत. अतिदक्षता खाटांची एकत्रित संख्या १९२३ आहे. आश्चर्य म्हणजे या शहरावर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. कोरोनाचे लक्ष्य आता पक्क्या इमारती आणि उच्चभ्रू साेसायट्या आहेत. १०३१९ इमारती सध्या प्रतिबंधित असून त्यात ३४ लाख रहिवासी अडकून पडलेत. शहरात लोक सर्रास विनामास्क फिरताना दिसतात. एकूण, सरकार अन् पालिकेवरचा मुंबईकरांचा भरवसा संपला आहे, याचा फटका आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या घोडचुका
१. जम्बो कोविड सेंटरची उभारणी.
२. जम्बो सेंटरमधील मृत्युदराकडे दुर्लक्ष.
३. चाचण्यांची घटलेली संख्या.
४. खासगी रुग्णालयांतील मृत्यू आकडेवारीचे अव्यवस्थापन.
५. खासगी रुग्णालयांच्या मनमानीला दिलेला वाव.

पालिकेसमोर आव्हाने
१. पावसाळ्यानंतर उद‌्भवणाऱ्या आजारांवर नियंत्रण व उपचार.
२. मास्कसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे.
३. बेस्ट फेऱ्या वाढवून प्रवाशांत अंतर राखणे.
४. खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावणे.
५. खासगी रुग्णालयांत खाटांचे व्यवस्थापन.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची ४७ % पदे रिक्त
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ४७ टक्के, निमवैद्यकीय ४३ टक्के आणि परिचारिकांची १३ टक्के पदे रिक्त आहेत. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाप्रमाणे लाख लोकसंख्येमागे ५५० वैद्यकीय बळ हवे. मुंबईत सध्या केवळ ७३ आहे. २०१८-१९ मध्ये पालिकेने आरोग्य विभागासाठी तरतूद केलेला ५४ टक्के निधी अखर्चित ठेवला. अपुरे मनुष्यबळ, निधीचा अप्रभावी वापर आणि आरोग्याच्या अक्षम पायाभूत सुविधांचा फटका कोरोना रुग्णांना बसला आहे. -निताई मेहता, विश्वस्त, प्रजा फाउंडेशन, मुंबई.

जम्बो सेंटरमध्ये सुविधांत वाढ
जम्बो सेंटरबाबत चुकीची समजूत आहे. कोविडबाधितांना योग्य उपचार मिळावेत म्हणून ११ खासगी रुग्णालयांतील ३५ डाॅक्टरांच्या सेवा जम्बो सेंटरसाठी पालिकेने घेतल्या आहेत. ७६५० खाटांसाठी येथे १५०० आरोग्य कर्मचारी असून सहा जम्बो सेंटरमध्ये २०७२२ रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. इक्बालसिंह चहल, पालिका आयुक्त, मुंबई.

मुंबई स्थिती
पालिका एका रुग्णामागे घेतेय ३० संशयितांचा शोध

१८४३१३ रुग्णसंख्या
२७६६४ सक्रिय रुग्णसंख्या
८४६६ मृत रुग्णांची संख्या

बातम्या आणखी आहेत...