आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे शुक्रवारी डोंबिवली येथे निधन झाले. सकाळी 11 वाजता दुसऱ्या रूग्णालयात नेत असताना रूग्णवाहिका बंद पडल्याने उपचाराअभावी त्यांचे निधन झाले आहे. सूर्यकांत देसाई यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत असा आरोप देसाई कुटुंबाने केला आहे.श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.
सूर्यकांत देसाई यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना दुसऱ्या रूग्णालयात नेण्यात येणार होते. यावेळी रूग्णवाहिका मध्येच बंद पडली व दुसऱ्या रूग्णवाहिकेतून देसाई यांना दुसऱ्या रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी कुटुंबियांकडून रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे.
सूर्यकांत देसाई हे 1995 ते 2000 या कालावधीत लालबाग परळ मतदारसंघातून आमदार होते. मागच्या 23 वर्षांपासून देसाई हे डोंबिवली पश्चिम भागात असलेल्या काशीकुंज सोसायटीमध्ये राहात होते. भागशाळा मैदानाजवळ ही इमारत आहे. देसाई यांच्या निधनाची बातमी कळताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, देसाई हे शिवसेनेचे जुने नेते आणि आमदार होते. माझी कारकीर्द त्यांच्यामुळे घडली. रुग्णवाहिका बंद पडल्याने त्यांचा उपचारअभावी मृत्यू झाला हे धक्कादायक आहे. यासंबंधीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून याची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी नांदगावकर यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.