आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत सिंह प्रकरण:'...जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात', मुंबई पोलिसांची खोटी बदनामी करण्यासाठी 80 हजार फेक अकाउंट सुरू केल्याच्या वृत्तानंतर शिवसेनेचा विरोधकांवर निशाणा

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या तपासाची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियातून मोहीम चालवली गेली होती, अशी माहिती समोर आली आणि यानंतर राजकारणात नवा वाद सुरू झाला आहे. यावरुन आता शिवसेनेने विरोधकांवर तोफ डागली आहे.

सीबीआयपूर्वी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल 80 हजारांहून अधिक फेक अकाऊंट्स सुरू करण्यात आले होते. त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली. या वृत्ताला मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही याला दुजारो दिला आहे, याच मुद्यावरून शिवसेनेने विरोधकांवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे. 'ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता त्या महाराष्ट्र भूमीची सुरक्षा घेणाऱ्या मुंबई पोलिसांची खोटी बदनामी करायला तुम्हाला 80 हजार फेक अकाउंट्स तयार करावे लागतात. पण शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स आहेत, महाराष्ट्र व मुंबईची जनता आहे जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात.' असे प्रताप सरनाईक यांनी म्हणाले आहेत.

परमबीर सिंह काय म्हणाले होते?
मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले होते की, या फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणाची चौकशी करून कायद्याचा भंग करणा-यांवर आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी सायबर सेलला आदेश दिले आहेत.

इटली, जपान आणि थायलंडसारख्या देशांमधून बनावट खाती उघडण्यात आली हे फेक अकाऊंटस् फक्त भारतातच नव्हे तर इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स या देशांमध्येही तयार केले गेले. “परदेशी भाषांमध्ये असलेल्या या पोस्ट आम्हाला ओळखता आल्या, कारण या पोस्टमध्ये हॅशटॅग वापरण्यात आलेले होते. जसे की #Justiceforsushant #sushantsinghrajput #SSR आणखी काही खात्यांची पडताळणी करण्याचे काम आम्ही करत आहोत,” असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला
मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले की, अशा मोहिम राबवून मुंबई पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. ते म्हणाले, 'कोरोनाच्या संकटात 84 पोलिसांचा मृत्यू झाला. सहा हजारांपेक्षा जास्त पोलिसांना करोनाची बाधा झाली, असे असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी आणि प्रतिमा मलीन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचे सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. मुंबई पोलिसांची असभ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आले. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.'

बातम्या आणखी आहेत...