आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केंद्रीय तपास यंत्रणेकडे जाऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे बुधवारी दुपारी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा राज्य सरकारविरोधात गेल्याने विरोधकांनी हल्ले सुरू केले आहेत, तर राष्ट्रवादी व काँग्रेस हे मित्रपक्ष शांत राहिल्याने शिवसेना एकाकी पडली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिवसेनेच्या वतीने परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. अॅड. परब म्हणाले, गुन्हा मुंबईत घडला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची ना हकरत घ्यावी, असे आमचे म्हणणे होते. कारण राज्यघटनेने जे अधिकार दिले आहेत त्यावर गदा येऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने बाजू मांडली होती. महाराष्ट्र सरकारने बाजू मांडताना विरोध केला नसल्याचे अॅड. परब म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांची पाठ थोपटली. ते म्हणाले की, सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केला, असे सर्वोच्च न्यायालयाने निवाडापत्रात म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात न्यायालयास कोणताही दोष आढळला नाही. ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी सूचक इशारा दिला. ‘सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासात दिशाभूल करणारे अदृश्य हात सीबीआय तपासात समोर येतील. टाळेबंदीच्या काळात १५ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा जीव गमवला असताना बेकायदेशीरपणे पार्ट्यांचे आयोजन करणारी पब आणि पार्टी गँग याप्रकरणी तुरुंगात जाईल,’ असे शेलार म्हणाले. भाजप खासदार नारायण राणे म्हणाले, हा भारतीय जनतेच्या मनातील निर्णय आहे. लोकांना हे प्रकरण सीबीआयकडे जावे हे अपेक्षित होते. त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. यामुळे शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक चांगलेच तोंडावर पडले आहेत, अशी टीका राणे यांनी केली.
शिवसेनेकडून संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ‘महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारे राज्य आहे. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे एक षड्यंत्र आहे,” असे राऊत म्हणाले.
शिवसेनेत अस्वस्थता
> सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेत अस्वस्थता आहे. आदित्य ठाकरे यांची छबी बिघडवण्यात भाजपला यश आल्याचे शिवसेना नेते मान्य करत आहेत.
> आदित्य यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी स्वत: स्पष्टीकरण करायला नको होते. त्यामुळे सोशल मीडियात भाजपने टाकलेल्या जाळ्यात शिवसेना अलगद सापडल्याचे सेनेत मानले जात आहे.
> सुशांतसिंहप्रकरणी शिवसेना नेतृत्वाने बिहारी लोकांविषयी काही वक्तव्य करावे असा भाजपचा डाव होता. त्याचा बिहार विधानसभा आणि मुंबई महापालिकेत भाजपला लाभ उठवायचा होता.
> सुशांतसिंह प्रकरणाचा सीबीआयकडे तपास गेल्याने शिवसेनेत चिंतेचा सूर आहे. आदित्य यांची चौकशी सीबीआयकडून होईल, अशी भीती शिवसेनेत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.