आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, संभाजी भिडे यांना तत्परतेने नोटीस पाठवणाऱ्या महिला आयोगाने मंत्री गुलाबराव पाटलांना नोटीस का बजावली नाही?, असा सवाल आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
तसेच, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना संभाजी भिडे टिकलीविषयी बोलतील का?, असा सवालही अंधारे यांनी भिडेंना केला.
भिडेंची एवढी हिंमत आहे का?
पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे म्हणाल्या, वंचित घटकातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काही पुढाऱ्यांचा कसा आहे, हे गेल्या काही दिवसांतील घटनांमधून दिसून आले आहे. बहुजन समुदायातील महिलांबद्दलच असे वक्तव्य वारंवार समोर येत आहेत. संभाजी भिडे अमृता फडणवीस यांना टिकलीविषयी बोलतील का? त्यांची तेवढी हिंमत आहे का? मात्र, बहुजन महिलांबद्दल काहीही बोलण्याचा जसा काही त्यांना परवाना मिळाला आहे.
गुलाबराव पाटलांना नोटीस का नाही?
सुषमा अंधारे म्हणाल्या, महिला आयोगाने अब्दुल सत्तार, संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची तातडीने दखल त्यांना नोटीस बजावली. मात्र, माझ्याविरोधात खालच्या भाषेत टीका करणारे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर महिला आयोगाने काहीच कारवाई का केली नाही? 'महिला आहे म्हणून सोडून देतो', असे वक्तव्य करुन राज्य सरकारमधील मंत्र्यांने समस्त महिलांचा अपमान केला आहे. असे असतानाही गुलाबराव पाटलांविरोधातही महिला आयोगाने कारवाईची तत्परता का दाखवू नये.
संरजामी माज
सुषमा अंधारे म्हणाल्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरूनही सत्तार थेट माफी मागण्यास टाळाटाळ करत आहे. यावरुन त्यांना सत्तेचा किती माज आहे, हे दिसते. सत्तारांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन काय आहे, हे त्यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे. महिलांचा सातत्याने अवमान, दुय्यम वागणूक त्यांच्याकडून दिली जात आहे. गुलाबराव पाटील तर आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठीच प्रसिद्ध असतात. महिला नसती तर दाखवले असते, असा संरजामी माज ते दाखवत आहेत. मंत्रिमंडळातील एक सदस्य असे वक्तव्य करतो, याबद्दल देवेंद्र फडणवीसांना काहीच वाटत नाही का?
फडणवीसांनी उत्तर द्यावे
सुषमा अंधारे म्हणाल्या, जळगावमध्ये महाप्रबोधन यात्रेदरम्यान माझ्या 4 सभा झाल्या. मात्र, एकाही सभेत मी आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. या सभांमुळे जनमत हालतेय, असे दिसत असल्यानेच केवळ गुलाबरावांच्या सांगण्यावरुन फडणवीसांनी माझ्या सभेवर बंदी घातली. पोलिसांनी मला ओलीस ठेवले. केवळ गुलाबराव पाटलांच्या आदेशाने मला पोलिस ओलिस कसे काय ठेवू शकता?, याचे उत्तर फडणवीसांनी द्यावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.