आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शब्दज्वाळांच्या ठिणग्या उडवणाऱ्या सावरकरांनी रचल्या 25 प्रेमकविता

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सर्वोच्च प्रेम केलं मातृभूमीवरच, अनोख्या कवितांनी सावरकरांचे उलगडले विविध पैलू
  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हटले की त्यांच्या एकापेक्षा एक सरस क्रांतिकारी काव्यरचना आठवतात. शब्दज्वाळांनी भारलेल्या त्यांच्या काव्याने तरुणाई पेटून उठली होती. त्यांचे वागणे, बोलणे, लिखाण सारेच आक्रमक होते. स्वातंत्र्यानंतरही त्यांच्यातील आक्रमकपणा कायम राहिला. तीच त्यांची ओळखही बनली, पण सावरकरांमध्ये एक मृदू प्रेमकवीही दडलेला होता. या प्रेमकवीने एक-दोन नव्हे तर तब्बल २५ प्रेमकविता लिहिल्या. त्यादेखील त्यांच्यातील प्रतिभेची साक्ष देतात. स्वातंत्र्यवीरांच्या या वेगळ्या पैलूविषयी त्यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक पार्थ बावस्कर यांनी जे सांगितले ते असे.

मुंबई सोडून सावरकर शिक्षणासाठी लंडनला जहाजाने निघाले. प्रवासात ते अधूनमधून डेकवर येऊन आकाशाकडे बघत रमत. एका रात्री तारकांनी भरलेलं आकाश पाहून त्यांना काव्यस्फूर्ती झाली. रात्रीच्या रम्यतेत त्यांना आपले जिवलग आठवू लागले असावेत. आकाशातल्या चांदण्या त्यांना चंद्राशी क्रीडा करणाऱ्या अप्सरा वाटू लागल्या. त्यांना तो चंद्रमौळी शंकर आठवला, प्रेमाच्या पाठोपाठ अलगद सावरकरांच्या काव्यातून शृंगार फुलू लागला.

त्यांची ‘तनुवेल’ कविता बघा. नुकत्याच झोपेतून जागे झालेल्या प्रियकराला, सकाळी खिडकीतून बाहेर दिसलेली त्याची प्रिया त्यांनी वर्णिली आहे. ती दोन्ही हात उंचावून बागेतली जाईजुईची सुंदर फुले तोडते. तारुण्याने मुसमुसलेल्या तिच्या शरीरातला प्रत्येक बहर प्रियकराला मोहित करतो. तिला बघून तो म्हणतो, “उंचविता कर छातीवरती ये चोळी तटतटुनी, कुरळ केश रुळताती गोरट्या मानेवरी सुटुनी.” मधूनच ती त्याच्या खिडकीत डोकावून बघते. त्याला पाहून हसते. तिच्या मोहक हास्याने दोघांच्याही मनात प्रेमाभिलाषांचे अंकुर फुटतात. त्याची प्रेमभावना व्यक्त करताना सावरकर लिहितात.

“अशी सकाळी फुले तोडिता पाहियली जे तुला, फुलवेलीहुनी तनुवेलचि तव मोहक दिसली मला !” स्वातंत्र्यवीरांच्या संन्यस्त खड्ग नाटकात तसा हिंसा आणि अहिंसेचा वाद. वीररसाची वर्णने. परंतु त्यातही त्यांची कविता प्रेमाचे चार क्षण शोधते. काही काळासाठी युद्धविराम झालाय आणि तिचा प्रियकर भेटीसाठी आला. ते दोघे एकमेकांना बघून आता प्रेमाच्या महासागरात बुडून जाणार असा तो क्षण. त्याची ती इतकी आतुरतेने वाट बघत होती की.. शतजन्म शोधिताना, शत आर्ति व्यर्थ झाल्या, शतसूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या. आता इतका काळ लोटला आणि इतक्या काळानंतर तो प्रणयक्षण माझ्या आयुष्यात आला, “तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, सुखसाधना युगांची, सिद्धीस अंती गाठी”. ‘पावनलीला’ या कवितेत गोदावरीवर स्नान करणाऱ्या स्त्रियांची वर्णने आहेत. कुणी एक अनोळखी लगट करू लागतो. तेव्हा त्या लावण्यवती त्या लगटखोराला त्याची जागा दाखवतात. तो पळून जातो. परपुरुषाच्या वाईट संकेताला थारा न देणारी, अस्सल ‘प्रेम’ करणारा पुरुष शोधणारी प्रेमांगना ‘स्त्री’ सावरकरांच्या कवितेत दिसते. ‘तारकांस पाहून’ या कवितेत सावरकरांनी भगवान शंकराच्या क्रीडेचं वर्णन “टपकत संचितवीर्य प्रभूचे बिंदू बिंदू गेले” अशा शब्दांत केले आहे. चुंबनदृश्य वर्णताना एका कवितेत ते म्हणतात, मनमोहक ललने ये लगट अंगाला | मान करीत वरि मुखासी माझ्या लाव तुझ्या गाला||”

हल्लीच्या भाषेत सांगायचं तर त्यांनी प्रेमकाव्याच्या बाबतीत बोल्डनेसच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. तरीही या कविता अश्लीलतेकडे झुकत नाहीत हे त्यांच्या काव्याचे यश !

सावरकरांची प्रेमकविता शृंगारापुरती सीमित राहिली नाही. कवितेतून उत्तान शृंगार पाझरणाऱ्याचा प्राण मातृभूमीसाठी तळमळलेला होता. त्या प्रेमात सुखाभिलाषेचा अंकुर नव्हता. कारण त्याला भक्तीचे अधिष्ठान होते. गोरापान चेहरा, सडसडीत तनुयष्टी, तेजस्वी डोळे, कुणालाही सहज आकर्षून घेईल असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. शिवाय ते धाडसी, साहसी. त्यांच्यावर त्या काळात तरुणी भाळल्या नसतील का? पण ज्यांनी सावरकरांना बघितलं, ते सगळे एकमुखाने म्हणतात, “If at all there was any sweetheart in his his life….it was his motherland only !’

सावरकरांनी सर्वोच्च प्रेम केलं ते फक्त मातृभूमीवर ! मातृभूमीबद्दलची प्रेमकविता ते खऱ्या अर्थाने जगले. एका कवितेत त्यांनी म्हटले, की खरं तर भगवंताने मला इथे पाठवलं ते कविता करण्यासाठीच. पण नंतर तो मला म्हणाला, “परी उणीव तेथे जा जा … क्रांतीच्या बाष्पयंत्राचा कक्ष तो.” सध्या काव्य लिहिणारे बहुत आहेत. पण तुझी गरज आहे ती क्रांतीच्या समरासाठी !

हे क्रांतिसमर लढताना विसाव्याचे जे क्षण हाती गवसले त्यात सावरकरांनी सुमारे २५ प्रेमकाव्ये रचली. यातून जगाला दिसतो वरवर “वज्रादपि कठोर” पण आतून “कुसुमासारखा कोमल” “प्रेमकवी” सावरकर!

बातम्या आणखी आहेत...