आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अविनाश जाधव यांना तडीपारची नोटीस:लोकांसाठी भांडतोय तर मला तडीपारची नोटीस? हे मला महाराष्ट्र शासनाकडून मिळालेलं बक्षिस,अविनाश जाधव यांचा संताप

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन याविषयी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी याविषयी प्रचंड संतापही व्यक्त केला आहे. त्यांना पाच जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलं आहे.

अविनाश जाधव हे वसई पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन केलं होतं. त्याच प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी अविनाश जाधव यांना खुलासा करण्यासाठी 4 ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आल्याची नोटीस आली आहे.

ठाण्यामध्ये महापालिकेबाहेर कामावरुन काढण्यात आलेल्या नर्सेससाठी अविनाश जाधव हे आंदोलन करत होते. याच वेळी त्यांना ही नोटीस आली. तेव्हा त्यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत याचा संताप व्यक्त केला आहे. जाधव म्हणाले की, मी गेली अनेक वर्ष सातत्याने लोकांसाठी आंदोलन करतं आहे. कोणतंही आंदोलन मी आजपर्यंत स्वत:साठी केलेलं नाही. वसईतही जे आंदोलन केलं होतं ते कोविड सेंटरसाठी केलं होतं. आजही विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा येथून आलेल्या मुलींसाठी आंदोलन मी करतोय. आंदोलन सुरु असतानाच मला तडीपारीची नोटीस आली आहे.' असं ते व्हिडिओमध्ये सांगत आहेत.

लोकांसाठी भांडतोय तर मला तडीपारची नोटीस दिली? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. तसेच लोकांची मदत केल्या बद्दल हे मला महाराष्ट्र शासनाकडून मिळालेलं बक्षिस असल्याचंही ते म्हणाले. ठाण्यात एवढे गुंड आहेत ते हद्दपार होत नाहीत. आणि लोकांसाठी भांडतोय तर मला नोटीस पाठवली. आता लोकांसाठी कोणी भांडायचं नाही का? माझी पहिली सभा झाली तेव्हा मला एक कोटींचा दंड लावला होता. त्याचदिवशी मला तडीपारीच्या नोटीस येतील असं म्हटलं होतं. असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.