आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपवण्यासाठी विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात आणि त्यासाठी अंतिम वर्षासाठी सर्व वर्षांच्या सत्रांच्या सरासरीइतके गुण किंवा श्रेणी प्रदान करण्याची तसेच श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच मुंबई, पुण्यासह औरंगाबादची परिस्थिती सतत बदलत आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
विद्यापीठांच्या परीक्षा तसेच शैक्षणिक वर्षाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ आदी सहभागी झाले होते. कोरोना संकटामुळे सगळ्याच गोष्टी पुढे गेल्या आहेत. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू करायचे याबाबतही विविध प्रस्ताव तयार केले जात आहेत.
ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूमचा विचार
यापुढेही अशी संकटे येऊ शकतील. त्याचा विचार करून शिक्षण, उद्योग आणि कार्यालये सुरू राहतील अशी पद्धती विकसित करावी. त्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी वाढवता येईल का याचा विचार करावा. शिक्षण हे जीवनावश्यक आहे. शिक्षण सुलभतेने घरच्या घरी कसे दिले जाईल. त्यासाठी ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम्स अशा पर्यायांचाही विचार करावा, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.