आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौक्ते वादळाचा तडाखा:'जहाज बुडू लागताच उडी घेतली, 14 तास समुद्रामध्ये पोहत होतो...'

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वादळातून बचावलेल्या सुनीलकुमार यांचा चित्तथरारक अनुभव

जहाज बुडू लागताच सोमवारी दुपारी १२ वाजता आम्ही समुद्रात उडी घेतली. पहाटे ४ वाजता नौदलाची बोट आमच्यापर्यंत पोहोचली. तब्बल १४ तास आम्ही खवळलेल्या अरबी समुद्रात पोहत होतो, अशा शब्दांत पी ३०५ जहाजावरून सुखरूप परतलेल्या कुशीनगर येथील सुनीलकुमार श्याम याने आपबीती कथन केली. बॉम्बे हाय येथील विंधन विहिरीसाठी आॅफकाॅम कंपनीच्या पी ३०५ बार्जवर उत्तर प्रदेशातील सुनीलकुमार गेले वर्षभर इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. तो म्हणाला, सोमवारी सकाळी बॉम्बे हायच्या तळावर तीन बार्ज (मालवाहू जहाज) होत्या. त्यातील दोन परत गेल्या. आमच्या बार्जवर ३०० कामगार असावेत.

सकाळी ६ च्या सुमारास बार्ज नांगरपासून अलग झाली आणि भरकटली. कॅप्टनने बार्ज बुडू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्या वेळी आम्ही गेटवे ऑफ इंडियापासून दीडशे किमी खोल समुद्रात होतो. दुपारच्या सुमारास बार्ज काही मिनिटात बुडणार होती. शेवटी उरलेल्या ६० ते ७० कामगारांनी लाइफ जॅकेट घातले अन् समुद्रात पटापट उड्या मारल्या. लाइफ जॅकेटमुळे खवळलेल्या समुद्रात आम्ही टिकून राहिलो. मोबाइल, पैसे, एटीएम इतर सामान समुद्रात गेले. पहाटे चारच्या सुमारास नौदलाची युद्धनौका आली. त्यामुळे आम्ही बचावलो.

जहाजावरील २२ ठार, ६५ बेपत्ता
तौक्ते चक्रीवादळात अरबी समुद्रात अडकलेल्या पी ३०५ जहाजावरील २२ जणांचा मृत्यू झाला असून ६५ लोक बेपत्ता झाले आहेत. गुजरातच्या १२ जिल्ह्यांमध्ये ४५ जण दगावले अाहेत. अरबी समुद्रात चार जहाजे बेपत्ता झाली होती. त्यावर ७०७ प्रवासी, कर्मचारी होते. त्यापैकी ६२० लोकांना वाचवण्यात अाले आहे. ओएनजीसीचे पी ३०५ जहाज, जीएएल कन्स्ट्रक्टर,सागर भूषण आणि सपोर्ट स्टेशन -३ ही चार जहाजे बेपत्ता झाली होती. सर्वाधिक लोक पी ३०५ या जहाजावर होते. त्यावरील १६ लोकांना वाचवण्यात यश आले असून इतर तीन जहाजांवरील ४३४ लोकांचीही सुखरूप सुटका करण्यात आली आहे. नौदलाच्या आयएनएस कोची, आयएनएस बेतवासह पी ८१ या विमानाच्या साहाय्याने बचाव अभियान करण्यात आले होते.

पंतप्रधानांची हवाई पाहणी
तौक्तेचा तडाखा बसलेल्या गुजरात आणि दीवच्या भागांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हवाई पाहणी केली. त्यानंतर अहमदाबाद येथे नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गुजरातसाठी १ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

बातम्या आणखी आहेत...