आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसीआर-ठाकरे भेट:तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासमवेत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आंतरराज्यीय संयुक्त जलसिंचन प्रकल्पांविषयीही विस्तृत चर्चा झाली.

या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते.

बैठकीत बाभळी बंधारा, तुम्मीदीहेटी, मेडीगड्डा बॅरेज, चन्खा-कोरटा बॅरेज या सिंचन प्रकल्पांच्या अनुषंगाने चर्चा झाली. तसेच उभय राज्यात सुरु असलेल्या उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विविध योजना, प्रकल्पांचीही चर्चा करण्यात आली. जलसिंचन प्रकल्पांतील आंतरराज्यीय सहकार्य आणि त्यातील विविध तरतुदींबाबतही यावेळी विस्ताराने ऊहापोह करण्यात आला. दोन्ही राज्यांदरम्यानचे विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवणाऱ्या उपाययोजनांवर भर देण्याबाबतही चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...