आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नवी मुंबईजवळ उभारणार तिरुपती देवस्थानचे मंदिर; भूखंड देण्याचा प्रस्ताव सिडको पाठवणार शासनाला

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील भक्तांना श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी आंध्र प्रदेशातील तिरुपती तिरुमला देवस्थान नवी मुंबईतील उलवे येथे श्री बालाजीचे मंदिर उभारणार आहे. त्यासाठी भूखंड वाटप करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावास संचालक मंडळाची मान्यता घेऊन शासनाच्या मंजूरीस पाठवण्याची सूचना सिडकोला केली होती, त्यानुसार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर विचार करून प्रचलित धोरणानुसार शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील सर्वच भाविकांना तिरूपती येथे जाणे शक्य होत नाही. अशा भक्तांकरिता महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईजवळ बालाजीचे मंदिर उभारावे अशी मागणी तिरुपती तिरुमला देवस्थान यांच्याकडून राज्य शासनाला वारंवार करण्यात येत होती. या अनुषंगाने तिरुमला तिरुपती देवस्थान अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी 27 फेब्रुवारी 2022 रोजी पत्र लिहून नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बालाजी मंदिर उभारण्यासाठी जागा मंजूर करण्याची विनंती केली. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिडकोस कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी, अतिरिक्त मुख्याधिकारी धर्मा रेड्डी, देवस्थानचे विश्वस्त मिलिंद नार्वेकर, सौरभ बोरा यांनी नवी मुंबईतील उपलब्ध भूखंडांची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीमध्ये उलवे येथील भूखंड निश्चित करण्यात आला हाेता.

वर्षभरात मिळणार भूखंडाचा ताबा
हा भूखंड सिडकोतर्फे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला एमटीएचएल प्रकल्पांतर्गत कास्टिंग यार्डकरिता लीव्ह अँड लायसन्स तत्त्वावर दिलेला आहे. सिडकोने केलेल्या विनंतीनुसार एमएमआरडीएने भूखंडाचा सिडकोकडे पुन्हा ताबा देण्यास मान्यता दिली आहे. मार्च ते सप्टेंबर २०२३ पर्यंत सिडकोतर्फे या भूखंडाचा ताबा मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...