आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई मेट्रोवरून ठाकरेंवर निशाणा:प्रकल्प कुणीही रोखू शकत नाही - फडणवीस; राजकीय प्रदूषणच जास्त - CM शिंदे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

मुंबईतील कुलाबा-सिप्झ या पहिल्या भुयारी मेट्रोची चाचणी आज यशस्वीरित्या पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही चाचणी झाली. यानंतर झालेल्य कार्यक्रमात मेट्रो प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंना चिमटे काढले.

मुबंई मेट्रो प्रकल्पाचे काम आता वेगाने पूर्ण होईल. हा प्रकल्प आता कुणीही थांबवू शकत नाही, असे आव्हानच फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले. तर, या प्रकल्पावरून राजकीय प्रदुषणच जास्त झाले, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

कमी बॉलमध्ये जास्त रन

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मेट्रो प्रकल्पावरून राजकीय प्रदुषणच अधिक झाले. त्यामुळे हा प्रकल्प रखडला. मात्र, आता या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होईल. कारण आमच्या सरकारला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आहेत. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन आता जेमतेम 2 महिने झाले आहेत. तरीदेखील अडीच वर्षांपूर्वी रखडलेले अनेक प्रकल्प आता मार्गी लागत आहेत. याबाबत नरेंद्र मोदी यांनीही राज्य सरकारच्या पाठिमागे पूर्ण शक्तीने उभे राहण्याची ग्वाही दिली आहे. राज्याच्या विकासासाठी वेगाने प्रकल्प राबवण्याच्या सूचना मोदींनी केल्या आहेत.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

शिंदे म्हणाले, सरकार स्थापन होताच बहुचर्चित अशा मेट्रो प्रकल्पाची स्थगिती आम्ही उठवली. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात अनेक प्रकल्प सुरू केले. फडणवीसांच्या 5 वर्षाच्या काळात राज्यात वेगाने प्रकल्प पुढे जात होते. मात्र, अडीच वर्षांत त्यांचे काम रखडले.

पहिले एक होता, आता दोन

मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले. शिंदे म्हणाले, पूर्वी विरोधकांसमोर केवळ देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान होते. मात्र, आता त्यांच्यासोबत मीदेखील आहे. पहिले केवळ एक होता. आता दोन आहेत. त्यामुळे सरकार चालवताना आम्हही सर्व आव्हानांना सक्षमपणे तोंड देऊ. तसेच, विकासाच्या बाबतीत कधीही राजकारण करणार नाही, अशी ग्वाहीदेखील शिंदेंनी दिली.

उपमुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई मेट्रो ३ ची ट्रायल रन यशस्वी झाली आहे. ही मेट्रो आता कुणीही रोखू शकत नाही, असा सिग्नलच या चाचणीने दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले आहेत. यापुढेही काही अडचणी आल्या तर त्या अडचणी दूर करण्याचा त्यांचा मानस आहे.

ठाकरेंमुळे प्रकल्प रखडला

प्रकल्पावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. फडणवीस म्हणाले, प्रकल्पाचे नियोजीत वेळेनुसार काम झाले असते तर मेट्रोचा पहिला टप्पा 2023 मार्चपर्यंत पूर्ण धावू शकला असता. मात्र, मध्ये जे काही वादविवाद झाले, प्रकल्पाला स्थगिती आली. त्यामुळे पहिला टप्पा आता 2023 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केले नसते तर डिसेंबरपर्यंतही हा प्रकल्प धावू शकला नसता.

सामान्यांवर भर पडला असता

देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रकल्प आणखी लांबला असता तर 20 हजार कोटींच्या या प्रकल्पाची किंमत आणखी 15 हजार कोटींनी वाढली असती. त्याचा भार तिकिटांच्या माध्यमातून सामान्य मुंबईकरांवरच आला असता. मेट्रोच्या कार डेपोवरून जो काही वाद झाला तो पर्यावरणापेक्षा राजकीय अधिक आहे.

मुंबईकर प्रदुषमुक्त श्वास घेतील

फडणवीस म्हणाले, प्रकल्पाचा सर्व बाजूने विचार करूनच उच्च न्यायालय, हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा फायदाच होणार आहे. या मेट्रोतून 17 लाख नागरिक प्रवास करतील. त्यामुळे रस्त्यावरील 7 लाख वाहने कमी होणार आहेत. त्यामुळे शहराचे कार्बन उत्सर्जन प्रचंड कमी होईल व मुंबईकरांना प्रदुषणमुक्त श्वास घेता येईल.

मुंबई मेट्रो लाईन ३ (कुलाबा- बांद्रा-सिप्झ कॉरिडॉर) ट्रेन्सची वैशिष्ट्ये

 • मुंबई मेट्रो लाईन-3 च्या ट्रेन्स 8 डब्यांच्या असतील. 75 % मोटरायझेशनमुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील.
 • रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे 30 टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.
 • एका गाडीतून अंदाजे 2400 प्रवासी प्रवास करू शकतील.
 • 85 किलोमीटर प्रतितास अशा वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होईल.
 • स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे मेट्रोचे डबे किमान ३५ वर्षे टिकू शकतील.
 • ट्रेनसाठी चालक विरहित प्रणाली असून अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) च्या सिग्नल व्यवस्थेमुळे 120 सेकंदची फ्रिक्वेन्सी ठेवणे शक्य होणार आहे.
 • प्रवाशांच्या सुलभतेसाठी डब्याच्या प्रत्येक बाजूला चार दरवाजे असतील.
 • स्वयंचलित प्रकाश नियंत्रण वैशिष्ट्यासह अद्ययावत वीज प्रणाली ऊर्जेचा वापर कमी करण्यास मदत करेल.
 • ट्रेनच्या छतावर स्थित व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (VVVF) प्रणालीद्वारे वातानुकूलन यंत्रणेचे नियंत्रण केल्याने 4 ते 5 टक्के ऊर्जा बचत होईल.
 • डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डायऑक्साइड आणि आर्द्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली असल्याने सर्व हवामान परिस्थितीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.
 • रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्हीच्या डिझाइनची योग्यता सिद्ध करून आवश्यकतेप्रमाणे पुढील नवीन तांत्रिक सुधारणा अंमलात आणता याव्यात म्हणून 'मुंबई मेट्रो लाइन -३' या संपूर्ण भूमिगत मर्गिकेवर आज ट्रेन चाचणी करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...