आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा:ठाकरे सरकार अदानी-अंबानीचे राखणदार? राजू शेट्टी यांचा आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईत विशाल मोर्चा काढला. पण, हा मोर्चा वांद्रे-कुर्ला संकुलातील अदानी व रिलायन्स कंपनींच्या कार्यालयावर पोचू शकला नाही. मोर्चाची पोलिसांनी अडवणूक केल्याबद्दल स्वाभिनामी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकार अदानी-अंबानीचे राखणदार आहे का, असा सवाल उपस्थित केला.

वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून सकाळी ११ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात सुमारे ८ हजार शेतकरी होते. स्वाभिमानीचे राजू शेट्टी, शेकापचे भाई जयंत पाटील, कष्टकरी सभेचे काॅ. किशोर ढमाले, लोकभारतीचे आमदार कपिल पाटील, हमाल पंचायतचे बाबा आढाव, प्रतिभा शिंदे आदी नेते मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चात “मोदी-अदानी मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चा पुढे जाऊ नये यासाठी पाेलिसांनी अडवणूक केली. शेवटी मोठा वाद झाल्यानंतर मोर्चा मार्गस्थ झाला. बीकेसीतील गुरुनानक चौकात मोर्चा अडवला गेला. कारण, तेथून अदानी व रिलायन्सच्या जिओ कंपनीचे कार्यालय जवळ होते. या वेळी शेतकऱ्यांनी जिओ कंपनीच्या सिमकार्डची रस्त्यावर होळी केली. दरम्यान, यावर महाविकास आघाडीने मौन साधले आहे.

मोर्चेकऱ्यांनी कुणालाही निवेदन दिले नाही
आम्ही दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. आमचा मोर्चा शांततेत आहे. तरी ठाकरे सरकारने इतका अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त का ठेवला आहे, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला. ठाकरे सरकारला अदानी-अंबानी या उद्योजकांचा इतका पुळका का, असा सवाल त्यांनी भाषणात केला. दिल्लीतले शेतकरी एकटे नाहीत, हे दाखवण्यासाठी मोर्चा काढल्याचे शेकापचे सरचिटणीस व आमदार भाई जयंत पाटील म्हणाले. मोर्चाने कुणाला निवेदन दिले नाही. वाहतुकीला अडथळा होईल, म्हणून मोर्चा रोखत असल्याचे या वेळी पोलिसांनी सांगितले.

किसान संघर्ष संवाद यात्रेचे चांदवडला स्वागत
चांदवड | दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकहून निघालेल्या किसान सभेच्या किसान संघर्ष संवाद यात्रेचे सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड चौफुलीवर किसान सभा व कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या वेळी शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मी कडूंचा राजीनामा घेतला असता : आंबेडकर
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू स्वत: बाईकवर दिल्लीला गेले. मी मुख्यमंत्री असतो तर कडूंचा राजीनामा घेतला असता, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मंगळवारी केली. मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आंदोलन करण्याचा अधिकार नाही. एकतर मंत्री राहा नाही तर आंदोलन करा, असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

बातम्या आणखी आहेत...