आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सामना'तून बाण:राज्यपालांवर देशद्रोहाचा खटला चालवायला हवा, विधानसभा अध्यक्षांकडून दिल्लीतील शाह्यांची गुलामी; ठाकरेंचा घणाघात

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाने काय लायकीची माणसे राज्यपालपदी नेमली होती, ते दिसले. महाराष्ट्रात सत्ताबदल होताच, अशा गुन्हेगारी वृत्तीच्या राज्यपालांवर देशद्रोहाचा खटलाच चालवायला हवा, अशी मागणी ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

विधानसभेच्या अध्यक्षांचा राजकीय पर्यटनाचा इतिहास पाहता, ते दिल्लीतील शाह्यांचेच गुलामी पत्करताना दिसत आहेत, अशी घणाघाती अशी टीका ही करण्यात आली आहे.

निर्लज्जपणा मुळावर

सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा चोख समाचार घेण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने काय लायकीची माणसे राज्यपालपदी नेमली होती, ते या सर्व प्रकरणात दिसले. महाराष्ट्रात सत्ताबदल होताच अशा गुन्हेगारी वृत्तीच्या राज्यपालांवर देशद्रोहाचा खटलाच चालवायला हवा. घटनेचे संरक्षण करण्याचे काम ज्या व्यक्तीवर सोपवले होते, तोच चोर निघाला. असे ‘चोर आणि लफंगे’ हीच भाजपच्या सत्तेची गुरुकिल्ली आहे. तेच त्यांचे बळ आहे. विचार, राष्ट्रभक्ती, नैतिकता वगैरे सगळे त्यांच्या दृष्टीने झूठ आहे, तर सरकारला बेकायदेशीर ठरवूनही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हसत आहेत. हाच निर्लज्जपणा महाराष्ट्राच्या व देशाच्या मुळावर येत असल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे.

कायद्याचा मुडदा पाडणार?

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, न्यायालयाने या आमदारांना दोषी मानले, पण त्यांना सुळावर चढविण्याचे काम विधानसभा अध्यक्षांचे आहे. न्यायमूर्ती निर्घृण गुन्हेगारास फाशीची शिक्षा ठोठावतात, पण त्याला प्रत्यक्ष फाशी देण्याचे काम स्वतंत्र यंत्रणेचे असते. सर्वोच्च न्यायालयाने तेच केले आहे, पण महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष कोठे आहेत? ते पडद्यामागे कोणत्या हालचाली करीत आहेत? न्यायालयाने गुन्हेगार ठरवलेल्या आमदारांवर ते कायद्याने कारवाई करणार की घटनापीठावर बसलेली ही व्यक्ती पुन्हा राजकीय स्वार्थासाठी दोषी आमदारांचा बचाव करणार? महाराष्ट्राच्या मातीला कलंक लावणार की, या मातीचे तेज दाखवणार? याच मातीत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जन्मास आले. त्याच मातीशी इमान राखणार की दिल्लीच्या ‘शाह्यां’पुढे झुकून घटना, कायद्याचा मुडदा पाडणार? विधानसभेच्या अध्यक्षांचा राजकीय पर्यटनाचा इतिहास पाहता ते दिल्लीतील शाह्यांचेच गुलामी पत्करताना दिसत आहेत.

नैतिकता मासुंदा तलावात...

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे बेकायदेशीर, घटनाबाह्य ठरवले. हा संविधान पीठाचा निकाल आहे. तरीही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विजयी हास्याने पत्रकारांसमोर आले व म्हणाले, ‘आम्हीच जिंकलो आहोत. निकाल आमच्या बाजूनेच लागला. लोकशाहीचा विजय झाला,’ असे हसत हसत सांगणे याला मराठीत कोडगेपणा म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाने या मंडळींना इतके उघडे-नागडे केले आहे की, त्यांच्या कमरेवर अंतर्वस्त्रही ठेवले नाही. अशा उघड्या अवस्थेत सिंहासनावर बसून हे निर्लज्ज मंडळ ‘व्ही फॉर व्हिक्टरी’च्या खुणा करून आनंद उत्सव साजरा करत आहे. नैतिकता तर त्यांनी ठाण्याच्या मासुंदा तलावात बुडवलीच, पण उरलीसुरली लाजही नागपूरच्या अंबाझरी तलावाकाठी उघडी होऊन नाचताना दिसत आहे.

अशी वेडी आशा...

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरही अग्रलेखातून जोरदार टोलेबाजी करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दल म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्षांचा राजकीय प्रवास मोठा आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप अशा प्रवासात ते बारा गावचे पाणी प्यायले आहेत. ते सांगतात व सांगत होते, ”अपात्र आमदारांचे प्रकरण शेवटी माझ्याकडेच येणार!” ही धमकी समजायची काय? तसे काही असेल तर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण अधिक गांभीर्याने घ्यायला हवे. विधानसभा अध्यक्ष सतत मुलाखती देतात. त्यांच्यासमोर जे प्रकरण निष्पक्ष न्यायासाठी आले आहे त्यावर बोलतात, हे नियमबाह्य आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांच्या वर्तनावर आवाज उठवायला हवा. विधानसभा अध्यक्ष या सर्व प्रकरणात वेळकाढूपणा करतील व प्रकरण शेवटी थंड्या बस्त्यात ढकलले जाईल ही लोकांच्या मनात भीती आहे, मात्र विधानसभा अध्यक्षदेखील घटनेवर श्रद्धा ठेवून सबुरीने हे प्रकरण हाताळतील अशी वेडी आशा बाळगायला काय हरकत आहे?, म्हणत नार्वेकर यांना टोला हाणला आहे.

संबंधित वृत्तः

निवडणूक आयोग ब्रह्मदेव नाही:राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले, नैतिकता असेल तर शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा, उद्धव ठाकरेंचे आव्हान

एक घाव दोन तुकडे:मुख्यमंत्री पदाचा राजीनामा का दिला, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले; शिंदे-फडणवीसांनाही दिले आव्हान

शिंदे सरकारवरचे संकट टळले:ठाकरेंचा राजीनामा आत्मघात ठरला; वाचा सुप्रीम कोर्टाने ओढलेले ताशेरे आणि नोंदवलेली निरीक्षणे

40 आमदारांचे बंड ते आजचा खंडपीठाचा निकाल, वाचा राज्यातील सत्तासंघर्षात केव्हा काय व कसे घडले

CJI चंद्रचूड चर्चेत:महाराष्ट्र-दिल्लीच्या सत्तासंघर्षावर ऐतिहासिक निकाल, वडीलही होते सरन्यायाधीश, जाणून घ्या कारकीर्द