आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे गटाचे काही मंत्री, आमदार व खासदार अयोध्या दौऱ्याला गेले नाहीत. त्यावरुन शिंदे गटात सरळ दोन गट पडले आहेत व उद्याच्या बेदिलीची ठिणगी अयोध्येच्या भूमीवर पडली आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात यावर भाष्य करण्यात आले आहे.
तर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही शिंदे गटात काहीतरी गडबड सुरू आहे. लवकरच ही गडबड बाहेर येईल, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात शिंदे गटाचे काही आमदार व खासदार का अनुपस्थित राहिले, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कोण गैरहजर होते?
आपण सर्व 40 आमदारांसह प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे या दौऱ्यात शिंदे गटातील बहुतांश आमदार आणि खासदारांचा समावेश होता. मात्र कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू, तर खासदार भावना गवळी या अनुपस्थित होत्या. हे चौघे अयोध्या दौऱ्यात का सहभागी झाले नाहीत, यामागे एक मोठे रहस्य असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.
अयोध्येत राजकीय निरोप समारंभ?
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, शिंदे सरकारातील काही मंत्री आणि आमदार अयोध्येत गेले, पण बरेच आमदार अयोध्या यात्रेत सामील झाले नाहीत, ते महाराष्ट्रातच राहिले. श्रीरामांच्या दर्शनास जाऊ नये असे त्यांना का वाटले, हे रहस्य आहे. शिंदे गटात सरळ दोन गट पडले आहेत व उद्याच्या बेदिलीची ठिणगी अयोध्येच्या भूमीवर पडली आहे. त्यामुळे अयोध्येत उत्सव झाला की राजकीय निरोप समारंभ हे येणारा काळच ठरवेल.
मंत्रिमंडळ विस्तार होणे कठीण
संजय राऊत यांनीही आज पत्रकार परिषदेत यावर मोठा दावा केला. संजय राऊत म्हणाले, शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात त्यांच्याच आमदारांचा एक मोठा गट गेला नाही, हे वास्तव आहे. काही तरी गडबड सुरू आहे. नेमकी काय गडबड सुरू आहे, हे लवकरच कळेल. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणे, आता कठीण दिसत आहे.
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काही जण नाराज?
एकनाथ शिंदे यांच्या घाईघाईने झालेल्या शपथविधीनंतर ते लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतील, असे मानले जात होते. मात्र, असे काहीच घडले नाही. एकनाथ शिंदे यांच्या स्थापन झालेल्या सरकारलाच ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येईल? याची खात्री नसल्यानेच मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी तर आता मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही, असा दावा केला आहे. दुसरीकडे, राज्यात केवळ 2 जणांचे सरकार आहे. भाजप व शिंदेगटातील मतभेदांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे, अशी टीका विरोधक सातत्याने करत आहेत. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिंदे गटाचे काही आमदार नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे आता अयोध्या दौऱ्याला काही आमदार गैरहजर राहिल्याने पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत. अद्याप गैरहजर आमदारांनी अयोध्या दौऱ्याला हजेरी का लावली नाही?, याबाबत स्पष्टीकरण दिले नाही.
हेही वाचा,
हल्लाबोल:बाळासाहेब म्हणायचे, गद्दारांना रस्त्यावर पकडून मारा; शिंदेंना त्याचीच भीती, यामुळे एवढी सुरक्षा- संजय राऊत
एखाद्याने देशापासून गद्दारी केली असो की पक्षापासून गद्दारी केली असो. अशा गद्दारांचे रस्त्यावर कपडे काढून त्यांना चोप दिला पाहीजे, असे बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते. एकनाथ शिंदेंसह 40 गद्दारांनाही आपल्याला मारहाण होईल का?, अशी भीती आहे. त्यामुळेच त्यांना ऐवढी सुरक्षा दिली जात आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.