आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुचकामी सरकार, कोणतेही गांभीर्य नसलेले शिक्षणमंत्री व ढिले पडलेले हतबल प्रशासन सध्या महाराष्ट्राच्या नशिबी असल्याने राज्याचे नशीबही फुटले व पेपरही फुटले, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज म्हटले आहे की, राज्यात सध्या पेपरफुटीचे पेव फुटले आहे. राज्यातील ‘चाळीस डोके आणि पन्नास खोके’ सरकारचाही संबंध डोक्याशी कमी आणि खोक्यांशी जास्त आहे. मात्र हे पन्नास-पन्नास खोके मोजायला गणिताची काय गरज? असे आपल्या शिक्षणमंत्र्यांना वाटत असावे. गणिताचा पेपर फुटण्याचे असे काही ‘कनेक्शन’ आहे का, ते शिक्षणमंत्र्यांनी एकदा जाहीरच करून टाकावे.
राज्यात सर्वच परीक्षांचा बोजवारा
अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे शिक्षणाचाही खेळखंडोबा सुरू आहे. दहावीपासून बारावीपर्यंत सगळ्याच परीक्षांचे पेपर फुटत आहेत आणि मुलांच्या व्हॉटस्ऍप ग्रुपवर फिरत आहेत. बारावीचा गणिताचा पेपर तर परीक्षेआधीच ‘व्हॉटस्ऍप’ ग्रुपवर फिरत होता. बुलढाण्यापासून थेट मुंबईपर्यंत या पेपरफुटीचे धागेदोरे उघड झाल्याने गोंधळ उडाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांपासून दहावी-बारावीपर्यंत सगळ्याच परीक्षांचा बोजवारा उडाला आहे.
पेपरफुटीचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवणार?
पुढे अग्रलेखात म्हटले की, ‘लोकसेवा आयोगाचे प्रकरण आपण पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवू,’ असे ‘बुद्धिमान’ विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले होते. तसे बारावी पेपरफुटीचे प्रकरणही ते पुढील निर्णयासाठी ते राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहेत काय? महाराष्ट्रात एकापाठोपाठ सगळेच पेपर व निकाल फुटताना दिसत आहेत. याआधी स्पर्धा परीक्षांचे, म्हाडाच्या परीक्षांचेही पेपर फुटले. बारावीचा रसायनशास्त्राचा म्हणजे केमिस्ट्रीचा पेपर फुटला व पाठोपाठ गणिताचा पेपर फुटला. हे कसले लक्षण मानायचे?
बेकायदेशीरपणे पास होण्याचा पायंडा
अग्रलेखात म्हटले आहे की, केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याप्रकरणी मालाडमधील खासगी क्लास चालकास अटक केली. महाराष्ट्रातील पेपरफुटीमागे खासगी क्लासचे चालक आहेत, असे सांगितले जात असले तरी इतकी गोपनीयता, सुरक्षा व्यवस्था ठेवूनही पेपर परीक्षेआधी फुटतात हे धक्कादायक आहे, पण महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून कोणत्याही परीक्षेशिवाय 'बेकायदेशीरपणे ‘पास’ होण्याचा नवा पायंडा सुरू झाला आहे.
मोदींपासून स्मृती इराणींच्या पदव्यांवर शंका
अग्रलेखात म्हटले आहे की, दुसरे म्हणजे निवडणूक आयोगापासून न्यायालयापर्यंत सर्व निकाल आधीच फुटले आहेत. ‘‘निवडणूक आयोगाचा निकाल काही झाले तरी आमच्याच बाजूने लागणार. शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार. सगळे सेटिंग झाले आहे,’’ असे छातीठोकपणे सांगणे म्हणजे निकाल आधीच फुटल्यासारखे आहे. शेवटी निकाल त्याच पद्धतीने लागला. भारतीय जनता पक्षात नरेंद्र मोदींपासून स्मृती इराणींपर्यंत प्रत्येकाच्या शैक्षणिक अर्हतेवर, पदव्यांवर शंका व प्रश्नचिन्ह आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या डिग्र्या बोगस आहेत व प्रत्यक्ष भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे सोंग आणणाऱ्या किरीट सोमय्यांची ‘डॉक्टरेट’ बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे अशा सत्ताधाऱ्यांच्या अमलाखाली ‘परीक्षा’ वगैरे हा फक्त फार्स ठरतो व सध्या महाराष्ट्रात तो जोरात सुरू झाला आहे. हजारो मुले, गोरगरीबांच्या घरातील विद्यार्थी दिवसरात्र कष्ट करतात, परीक्षेला जातात व त्याआधीच काही मुलांच्या हाती त्याच परीक्षेचा पेपर आलेला असतो.
खऱ्या गुन्हेगारांपर्यंत तपास पोहोचेल काय?
अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात ही लागण आतापर्यंत लागली नव्हती, पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून महाराष्ट्राच्या समाज जीवनात अशी वाळवी लागणे सुरू झाले आहे. रेडाबळी देऊन जे सत्तेवर आले, त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा बळी दिला आहे. सरकार चोऱ्यामाऱ्या करून, पैसे वाटून, नियम मोडून आले. त्यामुळे ‘पेपरफुटी’ प्रकरणाचे गांभीर्य त्यांना कळणार नाही. उलट ‘‘मिंधे गटात या, तुमच्या पोराबाळांच्या हाती परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका ठेवतो’’ अशी ऑफर द्यायलाही हे लोक मागेपुढे पाहणार नाहीत. पेपरफुटी प्रकरणाचा आता तपास होईल, पण खऱ्या गुन्हेगारांपर्यंत तपास पोहोचेल काय?
संबंधित वृत्त
सिंदखेडराजा येथे बारावीच्या परीक्षेचा पेपर फुटला!:पेपरफुटी प्रकरणी चाैकशी करुन दाेषीवर कारवाई करणार
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे बारावीच्या परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणाची माहिती आमच्याकडे आलेली आहे. याबाबत संबंधित ठिकाणच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण अहवाल बाेर्डाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पेपरफुटी प्रकरणात जे दाेषी आढळतील त्यांच्यावर याेग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बाेर्डाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.