आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:ठाकरे गटाकडून अवकाळी नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा; अयोध्या दौऱ्याला ठाकरे गट उत्तर देण्याच्या तयारीत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येत दाखल होत अयोध्येत रामलल्लाच दर्शन घेतले. हा फक्त शिवसेनेचा अयोध्या दौरा असल्याचे सांगितले जात असतानाच उपमुख्यमंत्रीही अयोध्येत दाखल झाले.

दरम्यान एकनाथ शिंदेच्या या अयोध्या दौऱ्याला ठाकरे गट अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भागात दौरा करून उत्तर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, राज्यभरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. अचानक आलेल्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावून घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून राज्यभर दौरा आयोजित करण्यात येणार आहे.

ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, सध्या विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि अमरावती भागात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याच काम सुरू असून त्यानंतर याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.

ठाकरेंकडूनही पाहणी होणार!

या दौऱ्यामध्ये स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जाणार असल्याचेही बोलले जात आहे. सध्या अवकाळी पावसाने केलेली नुकसान पाहणी स्वतः सर्व शिवसैनिक आमदार आणि स्थानिक प्रतिनिधी करतील, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलताना सांगितले आहे.

अवकाळीचा बळीराजाला फटका

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे राज्यातील विविध भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वादळी पावसासह गारपिटही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश, पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे बळीराजा मात्र हवालदिल झाला आहे.

ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे तापमानात चढ-उतार होत आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.