आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धवांचा Plan B:ठाकरे इंदिरा गांधींचा कित्ता गिरवणार; फिनिक्स भरारी घेण्याची तयारी, पडद्याआड नेमके काय सुरू?

मनोज कुलकर्णी । औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना कुणाची, याचा निकाल निवडणूक आयोगाच्याच दारी लागेल हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. हेच ध्यानात घेत उद्धव ठाकरे यांनी प्लॅन 'बी' तयार केलाय.

निवडणूक आयोगाचा निकाल विरोधात गेलाच, तर ठाकरे सेना पुन्हा एकदा राज्यभर रान उठवणार असून, विशेष म्हणजे थेट इंदिरा गांधींचा कित्ता गिरवण्याच्या तयारीत आहे. काय आहे ठाकरेंचा प्लॅन 'बी' जाणून घेऊयात...

सुरुवात उत्तर प्रदेशापासून...

उत्तर प्रदेशात 2017 साली समाजवादी पक्षात फूट पडली. तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांना एकमेकांविरुद्ध दंड थोपटले. खरा पक्ष कुणाचा, हा प्रश्न त्यावेळीही उपस्थित झाला. हा वाद निवडणूक आयोगाच्या दारी गेला. आयोगाने 1968 च्या निकालाचा हवाला देत, अखिलेश यादव गटाला खरा समाजवादी पक्ष आणि सायकल हे चिन्ह वापरायला परवानगी दिली.

जयललितांचेही थोडे पाहू...

तामिळनाडूत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ( एआयएडीएमके) पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष एम. जी. रामचंद्रन यांचे निधन झाले. त्यानंतर पक्षात फूट पडली. रामचंद्रन यांची पत्नी जानकी आणि जयललिता समोरासमोर आल्या. त्यावेळी निवडणूक आयोगाने पक्षाचं ‘दोन पाने’ हे चिन्ह गोठवले. मात्र, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जयललितांच्या नेतृत्वात दोन्ही गट एकत्र आले. तेव्हा पक्षाला पुन्हा चिन्ह मिळाले.

इंदिरा गांधींनाही धक्का...

काँग्रेसमध्ये पहिली फूट 1967 मध्ये पडली. पक्षातल्या सिंडिकेट गटाने इंदिरा गांधीला विरोध केला. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत या गटाने इंदिरा गांधीचे विरोधक संजीवा रेड्डींना काँग्रेसची उमेदवारी दिली. इंदिरा गांधीनी अपक्ष उमेदवार म्हणून तत्कालीन उपराष्ट्रपती व्ही. व्ही गिरींना रिंगणात उतरवले. यात गिरी विजयी झाले, पण पक्षात दुफळी माजली. काँग्रेस आय (इंदिरा गट) आणि काँग्रेस आर (रिक्विझिशनलिस्ट-सिंडिकेट गट) असे गट पडले. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 1972 सालात पक्षाचे चिन्ह होते गाय-वासरू. ते कुणाला द्यायचे, यावरून वाद विकोपाला गेला.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे.

गांधींच्या पावलावर पाऊल?

शिवसेनेत आता जी पक्ष चिन्हावरून लढाई सुरूय, तशीच काँग्रेसमध्ये सुरू होती. सादिक अलीविरुद्ध निवडणूक आयोग असा हा खटला रंगला. त्यात इंदिरा गांधीची काँग्रेस खरी मानली गेली आणि गाय वासरू हे चिन्ह त्यांना मिळाले. पुढे काँग्रेसमध्ये 1977 मध्ये फूट पडली. त्यावेळेस हे चिन्ह गोठवले गेले. तेव्हापासून काँग्रेसने पंजा या चिन्हावर निवडणुका लढवल्या. इंदिरा गांधींनी हे नवे चिन्ह त्या काळी घरोघरी पोहचण्यासाठी आकाशपाताळ एक केले. त्यासाठी रान उठवले. आता तोच कित्ता उद्धव ठाकरे गिरवणार आहेत.

ठाकरेंची पायाभरणी कशी?

देशाच्या उभ्या आणि आडव्या राजकारणातील हा इतिहास पाहता उद्धव ठाकरे आता ताकही फुंकून पित आहेत. त्यामुळेच त्यांनी आपला प्लॅन 'बी' तयार ठेवला आहे. त्यानुसार सध्या स्वतः उद्धव ठाकरे जास्तीत जास्त जनतेत मिसळताना दिसत आहेत. जितके ते मुख्यमंत्री असताना सक्रिय नव्हते, तितके आता सक्रिय असल्याचे आरोपही होत आहेत. याची तमा न बाळगता जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे मोहोळ जमवणे, त्यांच्यात मिसळणे, सभा घेणे हे त्यांनी सुरू केले आहे. दसरा मेळाव्याचीही जोरदार तयारी सुरूय. विशेषतः स्वतः आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढतायत. रश्मी ठाकरेंनी टेंभी नाका परिसरातील देवीच्या आरतीला हजेरी लावली. हा परिसर शिंदेंचा गड समजला जातो. ही सारी पुढच्या तयारीची पायाभरणीच म्हणावी लागेल.

उद्धव ठाकरे.
उद्धव ठाकरे.

पुढे काय करणार?

उद्धव ठाकरे यांच्या प्लॅन 'बी'नुसार सध्या पक्षाचे चिन्ह हातातून गेले आहे, या धरतीवरच काम सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका असो वा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतर निवडणुका या दुसऱ्या चिन्हावर लढवण्याची तयारी त्यांनी केलीय. त्यासाठी त्यांनी आपली सोशल मीडियाची टीम सज्ज केली आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले अथवा शिंदे गटाला दिले, तर जे चिन्ह मिळेल, ते जनमानसात पोचविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसलीय. त्यानुसारच काम करायचा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्यात. ठाकरेंच्या म्हणण्यानुसार सारे झालेच, तर शिवसेना पुन्हा फिनिक्सप्रमाणे भरारी घेईल, असा विश्वास ठाकरेंनाय.

बातम्या आणखी आहेत...