आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा गड होता. मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट आणि संदिपान भुमरेंनी उद्धव ठाकरे गटाला चांगलाच धोबीपछाड दिला आहे.
पैठण तालुक्यातील एकूण 7 ग्रामपंचायतीपैकी 6 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. तर पश्चिम मंतदारसंघातील औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूजच्या वडगाव कोल्हाटी आणि बजाजनगर ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने आपले प्रभुत्व दाखवत शिवसेनेचा बालेकिल्ला काबीज केल्याचे दिसून येत आहे. तर सोलापुरात मात्र ठाकरे गटाने चिंचपूर ग्रामपंचायतीमधील सर्व सात जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याने ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.
सोलापुरात काय परिस्थिती
पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटासोबत संघर्ष सुरू असताना पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पहिले यश मिळाले आहे. सोलापूरमधील चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय झाला आहे. या निकालाने सोलापुरात वर्चस्व असणारे माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे.
अमर पाटील यांच्या गटाने ही विजयश्री खेचून आणली आहे. ते माजी आमदार रतिकांत पाटील यांचा मुलगा आहेत. त्यांनी हत्तूर जि. प. निवडणुकीत 2017 ला विजय मिळवला होता. त्यांचा चिंचपूर गटात दबदबा आहे. तसेच जनसंपर्कही आहे. याचाच फायदा त्यांना चिंचपूर ग्रामपंचायत निवडणुकीत झाल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबादेत काय होणार?
औरंगाबाद मनपामध्ये शिवसेनेची गेली 30 वर्षे सत्ता आहे. मात्र यंदा ठाकरेंना औरंगाबाद मनपावर असलेली सत्ता कायम राखायची असेल, तर जोर लावणे गरजेचे असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकांवरून दिसून येत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीत शिवसेनेला अनेक प्रभागात आणि गटात उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे अशी परिस्थिती दिसून येत आहे. बंडखोर आमदारांचे असलेले मतदारसंघातील प्राबल्य लक्षात घेत आगामी मनपा आणि जिल्हा परिषदेत शिवसेनेला मोठे आव्हान असल्याची चर्चा सुरू आहे.
लोकसभेची परिस्थिती काय?
औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे 5 आमदार हे शिंदेंच्या गटात गेल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. मात्र मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आमदारांच्याासोबत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील 3 आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. कन्नड मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असला तरी औरंगाबाद पूर्व, मध्य, पश्चिम, गंगापूर- खुलताबाद, वैजापूर या मतदारसंघात शिंदेंच्या गटातील आणि भाजपचे आमदार असल्याने आगामी लोकसभेला देखील शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता यामुळे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.