आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वर्ष २०२२ मध्ये होऊ घातलेल्या राज्यातील ९० पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी शिवसेनेने राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान हाती घेतले आहे. २४ ते २७ फेब्रुवारीदरम्यान हे अभियान राबवले जाणार आहे.
वर्षा निवासस्थानी मंगळवारी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. त्याला सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे मंत्री, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे सेक्रेटरी, तसेच सेनेचे बहुतांश खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख असे १०० नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
अभियानाच्या कालावधीत राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांत सेनेचा एक आमदार आणि एक खासदार फिरणार आहे. बूथ बांधणी कितपत झाली आहे, याची ते खातरजमा करतील. अभियानामार्फत महाविकास आघाडी सरकारच्या विकास योजना जनतेपर्यंत पोचवा, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत बजावले आहे. २०२२ मध्ये राज्यातील पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या मोठ्या संख्येने निवडणुका आहेत. त्यात वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेने हे शिवसंपर्क अभियान हाती घेतले आहे. खासकरून ग्रामीण भागावर विशेष लक्ष द्या, असे उद्धव यांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते.
पूजा चव्हाण संशयास्पद आत्महत्याप्रकरणी शिवसेनेवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली असल्याच्या चर्चा होत्या. मात्र पूजा चव्हाणप्रकरणी किंवा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासंदर्भात कोणताही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला नाही, असे सेना आमदार दिलीप लांडे म्हणाले. बैठकीला माजी मंत्री व परंड्याचे नाराज असलेले शिवसेना आमदार तानाजी सावंत नेहमीप्रमाणे अनुपस्थित हाेते. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले होते. आत्मविश्वास दुणावलेल्या पक्षनेतृत्वाने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.