आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे पोलिस:बिल्डरकडून 6 कोटींची खंडणी, मुंब्रा पोलिस स्थानकातील 10 जण निलंबित; तपास NIA कडे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंब्रा विभागात राहणाऱ्या एका खेळणी व्यापाऱ्याकडून सहा कोटी रुपये लुटण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आज ठाण्याचे पोलिस आयुक्त जगजीत सिंग यांनी एकाच दिवशी मुंब्रा पोलिस स्थानकातील तीन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. यामुळे ठाण्यातील पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे.

मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागात राहणारे खेळण्यांचे व्यापारी फैजल मेमन यांच्या घरी 12 एप्रिल रोजी रात्री 12.30 च्या सुमारास पोलिसांनी खोटी धाड घातली. मेमन यांच्या घरातून 30 बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रत्येक बॉक्समध्ये एक कोटी याप्रमाणे 30 बॉक्समध्ये 30 कोटींची रोकड होती. हे 30 कोटींचे 30 बॉक्स मुंब्रा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) गीताराम शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक हर्षद काळे, रविराज मदने यांनी साक्षीदारांच्या उपस्थितीत ताब्यात घेतले. हे बॉक्स मध्यरात्री पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी हा काळा पैसा आहे, त्यातील अर्धी रक्कम आम्हाला दे, अशी मेमन यांना पोलिसांनी दमदाटी केल्याचे तक्रारदार इब्राहिम शेख यांनी पोलिस आयुक्त जयजित सिंग यांना दिलेल्या अर्जात नमूद केले होते. पोलिसांनी मेमन यांना दमदाटी करून त्यातील सहा बॉक्स मुंब्रा पोलिस ठाण्यातच स्वतःकडे ठेवून घेतले आणि 24 बॉक्स मेमन यांना परत केले.

प्रकरण कसे उघडकीस आले?
मुंब्रा पोलिसांनी ठेवून घेतलेल्या सहा बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटीप्रमाणे सहा कोटी रुपये होते. ही रोकड मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांच्या केबिनमध्ये मोजण्यात आली. परंतु इब्राहिम शेख नामक एका व्यक्तीने या घटनेबाबत ठाण्याच्या पोलिस आयुक्तांसह गृहखात्याला पत्र लिहून माहिती दिली. पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा प्रकार उघडकीस येईल, असा दावा अर्जदार इब्राहिम शेख याने केला होता. याबाबत राज्याचे गृहमंत्री, पोलिस महासंचालक, ठाण्याचे सहपोलिस आयुक्त, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त व कळवा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांनाही शेख यांनी अर्जाची प्रत रवाना केली होती. मुंब्रा पोलिसांच्या या तोडबाजीचे सीसीटीव्ही फुटेजसह वृत्त प्रसारित होताच ठाणे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली.

या दहा जणांवर कारवाई -
ठाणे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांनी मुंब्रा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक हर्षद काळे, रविराज मदने यांच्यासह पोलिस नाईक पंकज गायकर, जगदिश गावीत, दिलीप किरपण, प्रवीण कुंभार, अंकुश वैद्य, पोलिस शिपाई ललित महाजन, नीलेश साळुंखे यांना तत्काळ निलंबित केले.

बातम्या आणखी आहेत...